कळंब (प्रतिनिधी)- बालकांचे संरक्षण, सुरक्षितता आणि त्यांच्या हक्कांविषयी समाजात जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने तालुका विधी सेवा समिती व विधिज्ञ मंडळ कळंब यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी 'सुरक्षित बचपन अभियान' अंतर्गत शहरातून भव्य महारॅली दि . 31 रोजी सकाळी काढण्यात आली. न्यायाधीश, विधिज्ञ, पोलीस अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, शिक्षक आणि शेकडो विद्यार्थ्यांच्या सहभागाने कळंब शहरात बालसुरक्षेचा जागर घालण्यात आला.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार तसेच प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा अभिश्री देव यांच्या मार्गदर्शनाखाली 26 ते 31 ऑक्टोबर या कालावधीत हे अभियान राबविण्यात आले. या मोहिमेअंतर्गत कळंब तालुक्यातील 200 पेक्षा अधिक विद्यार्थी संख्या असलेल्या तब्बल 38 शाळांमध्ये जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले. विद्यार्थ्यांना वैयक्तिक सुरक्षितता, बालहक्क, संभाव्य धोके ओळखणे आणि संकटाच्या प्रसंगी मदत कशी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
महारॅलीचा प्रारंभ जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय, कळंब येथून झाला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक, सराफ लाईन आदी प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करीत रॅलीचा पुन्हा न्यायालय परिसरात समारोप झाला. जिल्हा परिषद प्रशाला, जिल्हा परिषद कन्या प्रशाला, पीएमश्री नगरपालिका शाळा क्रमांक 2 आणि विद्याभवन हायस्कूल येथील विद्यार्थी, मुख्याध्यापक व शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी जिल्हा न्यायाधीश-1 तथा तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष विक्रमादित्य के. मांडे, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर पी. आर. कुलकर्णी, सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर के. के. चौधरी, एन. एम. रेड्डी, ए. डी. जाधव, विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष ॲड. ए. के. फाटक यांच्यासह विधिज्ञ, पोलीस उपअधीक्षक संजय पवार, तहसीलदार, पोलीस अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, न्यायालयीन कर्मचारी व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
बालसुरक्षेबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
महारॅलीच्या समारोपप्रसंगी जिल्हा न्यायाधीश-1 विक्रमादित्य के. मांडे यांनी विद्यार्थ्यांना सुरक्षित बचपन अभियानाचे महत्त्व विशद केले. प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःच्या सुरक्षिततेबाबत जागरूक राहणे, अडचणीच्या प्रसंगी न घाबरता विश्वासू व्यक्ती, शिक्षक किंवा संबंधित यंत्रणांची मदत घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. बालकांच्या सुरक्षिततेसाठी केवळ यंत्रणांनीच नव्हे, तर पालक, शिक्षक आणि समाजातील प्रत्येक घटकाने जबाबदारीने पुढाकार घेण्याची गरज या अभियानातून अधोरेखित झाली.
