कळंब, (प्रतिनिधी)- दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शहराचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी कळंब नगर परिषद प्रशासनाने कंबर कसली आहे. धनेगाव येथील पंप हाऊसपासून डिकसळ येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंतच्या सुमारे 18 किलोमीटर लांबीच्या मुख्य जलवाहिनीवरील गळती शोधून दुरुस्ती, एअर व्हॉल्व्हची देखभाल आणि अनधिकृत नळजोडण्यांविरुद्ध कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. पाण्याची नासाडी रोखून उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यावर प्रशासनाने भर दिला आहे.
मुख्य जलवाहिनीवरील गळती तसेच एअर व्हॉल्व्हमधील बिघाडामुळे पाणी वाया जाण्याची आणि पाणीपुरवठा व्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता असते. ही बाब लक्षात घेऊन नगर परिषदेकडून जलवाहिनीची प्रत्यक्ष पाहणी करत आवश्यक ठिकाणी दुरुस्ती केली जात आहे. मुख्याधिकारी मंजुषा गुरमे यांनी स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. पाणीपुरवठा विभागप्रमुख सुषमा भालेराव आणि जगन्नाथ बावळे, राखुंडे यांच्या सहकार्याने कर्मचारी दुरुस्ती व देखभालीची कामे करीत आहेत.
अनधिकृत नळजोडण्यांवर कारवाई
मुख्य जलवाहिनीवर अनधिकृतपणे घेतलेल्या नळजोडण्यांविरुद्ध नगर परिषद प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे. अशा जोडण्यांमुळे पाणीपुरवठ्याच्या व्यवस्थापनात अडथळे निर्माण होण्याची शक्यता असल्याने संबंधित जोडण्या तोडण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. शहरातील अनधिकृत नळजोडण्या तातडीने अधिकृत करून घ्याव्यात; अन्यथा संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा नगर परिषद प्रशासनाने दिला आहे.
नागरिकांनाही पाणी बचतीचे आवाहन
दुष्काळी परिस्थितीत पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नागरिकांनी नळांना तोट्या बसवाव्यात, नळ सुरू असताना पाणी रस्त्यावर किंवा गटारीत वाहू देऊ नये, तसेच पिण्याच्या पाण्याचा वापर वाहन धुण्यासारख्या अनावश्यक कामांसाठी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
नगर परिषदेकडून जलवाहिनीच्या दुरुस्ती व देखभालीची कामे सुरू असली, तरी पाण्याची बचत करण्यासाठी नागरिकांचे सहकार्य तितकेच महत्त्वाचे आहे. उपलब्ध पाण्याचा आवश्यकतेपुरताच वापर करून पाण्याची नासाडी टाळावी, असे आवाहन मुख्याधिकारी मंजुषा गुरमे यांनी केले आहे.
दुष्काळाच्या काळात पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा असल्याने जलवाहिनीतील गळती रोखणे आणि अनधिकृत नळजोडण्यांवर नियंत्रण ठेवणे, हे नगर परिषद प्रशासनासमोरील महत्त्वाचे आव्हान ठरणार आहे.
