तुळजापूर (प्रतिनिधी)- ‌‘इडा-पिडा टळू दे, बळीचे राज्य येऊ दे' असे म्हणत दिवाळी साजरी करणाऱ्या माझ्या आया-बहिणींना यंदा दुष्काळामुळे साधी साडी घेणेही शक्य नाही. मुख्यमंत्री साहेब, तुम्ही दिवाळी साजरी करा आणि आम्ही शेतकऱ्यांनी शिमगा साजरा करायचा का? तेल, साखर आणि दिवाळीचा फराळ करण्यासाठी किती पैसे लागतात, हे मुख्यमंत्र्यांनी माझ्या आया-बहिणींना विचारावे. पाच हजार रुपयांत दिवाळी कशी साजरी करायची, हे सरकारनेच सांगावे, अशा शब्दांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष रवींद्र इंगळे यांनी सरकारच्या दुष्काळी मदतीवर सडकून टीका केली.

दिवाळीच्या सणातही शेतकऱ्यांच्या घरातील आर्थिक अंधार दूर झालेला नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तुळजापूर येथील जुन्या बसस्थानकासमोरील चौकात अनोखे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ठेसा, झुणका-भाकर खाऊन, बैलगाड्या व बैलजोड्यांसह शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणांचा निषेध करीत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात रवींद्र इंगळे बोलत होते.

मंत्री आणि आमदारांचे लाखो रुपयांचे काही दिवसांचे वेतन कापा. त्यातून मोठ्या प्रमाणात निधी उभा राहील. हा पैसा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना वाटा आणि त्यांनाही सन्मानाने दिवाळी साजरी करू द्या, असे आवाहन इंगळे यांनी केले.


घोषणांचा पाऊस; शेतकऱ्यांच्या घरात मात्र आर्थिक दुष्काळ!

हे सरकार केवळ पोकळ घोषणा करणारे सरकार आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर प्रत्यक्ष निर्णय घेण्याऐवजी आश्वासनांची खैरात केली जाते. कर्ज भरायचे नाही, पेटून उठायचे आणि 4200 रुपये मिळवायचे, अशी परिस्थिती निर्माण झाली असताना मराठवाड्यातील शेतकरी आपल्या हक्कांसाठी पेटून का उठत नाही? तो जागृत का होत नाही? असा सवाल इंगळे यांनी उपस्थित केला.

नोकरदार, व्यापारी आणि इतर घटकांना स्वातंत्र्य मिळाले; मात्र देशाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याला अद्याप खरे स्वातंत्र्य मिळालेले नाही. एका दाण्याचे हजार दाणे करणारा शेतकरी आज आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभा आहे. शेतकऱ्यांबरोबरच आता शेतकरी महिलाही आत्महत्या करू लागल्या आहेत, ही संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रासाठी अत्यंत दुर्दैवी बाब आहे, असेही त्यांनी नमूद केले.

गोकुळ दूध संघावर सत्ता मिळविण्यासाठी राजकीय नेते प्रयत्नांची पराकाष्ठा करतात; मात्र शेतकऱ्यांच्या हितासाठी हमीभावाचा कायदा मंजूर करण्याची वेळ येते, तेव्हा सरकार हा कायदा का करीत नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 75 हजार रुपयांचा पीकविमा मिळवून देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना संघर्ष करणार असल्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.


वृद्ध शेतकरी दाम्पत्यांसह महिलांचा आंदोलनात सहभाग

दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांनी दिवाळीच्या सणातही आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. या आंदोलनाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे तालुक्यातील वृद्ध शेतकरी दाम्पत्यांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. महिला शेतकऱ्यांची उपस्थितीही लक्षणीय होती. शेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्यासाठी बैलगाड्या आणि बैलजोड्यांसह रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांनी शासनाचे लक्ष वेधले.

यावेळी शेतकऱ्यांच्या विविध 12 मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार काळे यांना देण्यात आले. शेतकऱ्यांच्या मागण्या शासनदरबारी पोहोचवून त्यावर तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी मंडळ अधिकारी अमर गांधले आणि शहर तलाठी शरद दुधभाते उपस्थित होते.

या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विभागीय अध्यक्ष रवींद्र इंगळे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा नगरपरिषदेचे गटनेते अमोल कुतवळ, धनाजी पेंदे, तानाजी पाटील, विष्णुदास काळे, दुर्वास भोजने, प्रवीण कदम, सचिन कदम, रामेश्वर नेटके, शहाजी सोमवंशी, कल्याण भोसले, ईश्वर गायकवाड, बापू धुमाळ, विजय सिरसाट आदींसह संघटनेचे पदाधिकारी, वृद्ध शेतकरी आणि महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दिवाळीच्या सणात सर्वत्र आनंदोत्सव सुरू असताना शेतकऱ्यांना मात्र आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरावे लागत असल्याचे विदारक चित्र या आंदोलनातून समोर आले.


 
Top