तुळजापूर (प्रतिनिधी)- दीपावलीच्या सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने खासगी वाहनांनी तुळजापूरमध्ये दाखल होत असल्याने तीर्थक्षेत्र नगरीत वाहतूक कोंडीची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. शहरातील महामार्गासह प्रमुख चौक आणि अंतर्गत रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागत असून, वाहनचालकांना तासनतास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
दीपावलीच्या सुट्ट्यांमुळे महाराष्ट्रासह परराज्यांतून भाविकांचा मोठा ओघ तुळजापूरकडे सुरू आहे. बहुतांश भाविक खासगी चारचाकी व दुचाकी वाहनांनी येत असल्याने शहरातील रस्त्यांवरील वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. महामार्गावर अनेक वाहने रस्त्याच्या कडेला उभी राहत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.
तुळजापूर-धाराशिव मार्गासह तुळजापूर घाट आणि शेळी घाट परिसरातही वाहतुकीचा वेग मंदावला होता. या मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहने संथगतीने पुढे सरकत होती. घाटातील वाहतूक कोंडीमुळे वाहनचालकांना विशेष त्रास सहन करावा लागत आहे.
शहरातील प्रमुख चौक वाहतूक कोंडीच्या विळख्यात
तुळजापूर शहरातील जुना बसस्थानक चौक, नवीन बसस्थानक चौक, मलबा हॉस्पिटलसमोरील चौक, दीपक चौक आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक या भागांत सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. या चौकांतून जाणाऱ्या वाहनांची संख्या वाढल्याने काही वेळा वाहनांच्या रांगा दूरपर्यंत लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. परिणामी स्थानिक नागरिक, व्यापारी, रुग्णवाहिका आणि दर्शनासाठी आलेल्या भाविकांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. भाविकांचा ओघ कायम असून, वाहतूक नियोजनाचे मात्र आव्हान निर्माण झाले आहे.
