धाराशिव (प्रतिनिधी)- ‌ ‘संत येती घरा, तोचि दिवाळी-दसरा' या भक्तिभावपूर्ण उक्तीचा प्रत्यय धाराशिव शहरात आला. श्रीक्षेत्र तेर येथून कार्तिकी वारीसाठी पंढरपूरकडे मार्गस्थ झालेल्या संतश्रेष्ठ गोरोबा काका कुंभार यांच्या पायी दिंडीचे शहरात उत्साहात स्वागत धाराशिवच्या नगराध्यक्षा नेहा काकडे यांच्या हस्ते करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे नगराध्यक्षा नेहा काकडे आणि नगरपालिकेतील भाजपा नगरसेवकांच्या वतीने पालखीचे मोठ्या भक्तिभावाने स्वागत करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष नेहा काकडे यांनी पालखीची आरती करून संतश्रेष्ठ गोरोबा काकांच्या चरणी नतमस्तक होत दर्शन घेतले. टाळ-मृदंगाचा गजर, विठ्ठलनामाचा जयघोष आणि भाविकांची उपस्थिती यामुळे परिसर भक्तिमय झाला होता. यानंतर पालखीची जुन्या धाराशिव शहरातील पारंपरिक नगरपरिक्रमा झाली. विविध भागांत नागरिकांनी रांगोळ्या काढून, फुलांची उधळण करीत आणि आरती ओवाळून पालखीचे स्वागत केले.

वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलाची सेवा, या भावनेतून नागरिकांनी वारकऱ्यांचे आदरातिथ्य केले. संतश्रेष्ठ गोरोबा काकांच्या भक्ती, श्रमप्रतिष्ठा आणि समर्पणाच्या विचारांचा जागर करणारा हा पालखी सोहळा धाराशिवकरांसाठी भक्ती आणि आनंदाची पर्वणी ठरला.

 
Top