धाराशिव (प्रतिनिधी)-  धाराशिव जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा जलजीवन मिशनच्या अपूर्ण कामांसह पाणीटंचाई आणि अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारावरून चांगलीच वादळी ठरली. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या सभेत तब्बल निम्मा वेळ पाणीपुरवठा, जलजीवन मिशनच्या प्रलंबित योजना आणि पाणीटंचाई आराखड्यावर चर्चा झाली. अपूर्ण कामे पूर्ण दाखवून बिले उचलणे, योजना पूर्ण होऊनही गावांना पाणी न मिळणे, अधिकाऱ्यांकडून अर्धवट माहिती देणे आणि सभेला वरिष्ठ अधिकाऱ्यांची अनुपस्थिती अशा मुद्द्यांवर सर्वपक्षीय सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. अध्यक्ष अर्चनाताई पाटील यांनी 72 कोटींचा पाणीटंचाई आराखडा मंजूर झाल्याची माहिती देत उपाययोजनांच्या सूचना केल्या. तर मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदाळकर यांनी अर्धवट माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला. जि.प. ची आम सभा कांचनमाला संगवे, धनजय सावंत, महेश देशमुख, महमंदरफी तांबोळी यांनी प्रशासनाला धारेवर करून गाजवली आहे. 

जिल्हा परिषदेचा 72 कोटी रुपयांचा पाणीटंचाई आराखडा राज्य सरकारने मंजूर केल्याची माहिती अध्यक्ष अर्चनाताई पाटील यांनी सभागृहात दिली. यावर सदस्य धनंजय सावंत यांनी परंडा तालुक्याला या आराखड्याचा योग्य लाभ मिळत नसल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यावर अध्यक्षांनी सर्व तालुक्यांचे गटविकास अधिकारी आणि सभापती यांनी पाणीटंचाईचा आराखडा योग्य पद्धतीने तयार करून द्यावा, अशा सूचना केल्या. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामपंचायतींना पाच किलोमीटरपर्यंतच्या पाणीपुरवठा वाहिन्यांना मंजुरी देण्यात येणार आहे. तसेच विहिरींचे खोलीकरण, नवीन विहिरी घेणे, बोअर घेणे आणि पाणीपुरवठा वाहिन्यांची कामे सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यकारी अभियंता सुनिल कटकधोंड यांना धारेवर धरत, जि. प. अध्यक्षांकडे जलजीवनच्या कामांचे ऑडिट करण्याची मागणी करून, कामे अपूर्ण असतानाही पूर्ण दाखविले जात असल्याचा आरोप धनंजय सावंत, कांचनमाला संगवे, डॉ. जितेंद्र कानडे, दयानंद शिंदे यांनी केला. उमरगा तालुक्यातील बोरीतील सव्वा कोटींच्या कामात गंभीर प्रकार झाला असल्याची माहिती महेश देशमुख यांनी दिल्यानंतर जि. प. अध्यक्षा अर्चना पाटील यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले. 


अनुपस्थित अधिकाऱ्यांवर सदस्यांची नाराजी 

सर्वसाधारण सभेला वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता तसेच जलसंधारण विभागाचे अधिकारी उपस्थित नसल्यामुळे सदस्य तांबोळी यांनी नाराजी व्यक्त केली. धनंजय सावंत यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदाळकर यांच्याकडे अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीबाबत नाराजी व्यक्त करत त्यांना शिस्त लावण्याची मागणी केली.


Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top