तुळजापूर (प्रतिनिधी)- तीर्थक्षेत्र तुळजापूर नगरपरिषदेचा स्वच्छता ठेका घेतलेल्या समृद्धी कंपनीकडून काम करणाऱ्या कामगारांचे मागील तीन ते चार महिन्यांचे वेतन थकविण्यात आल्याने ऐन दीपावलीच्या सणात 50 ते 55 महिला व पुरुष कामगारांवर आर्थिक संकट ओढवले. थकीत वेतन मिळावे, या मागणीसाठी संतप्त कामगारांनी शनिवारी पहाटे सहा वाजल्यापासून नगरपरिषद कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केले. तब्बल दुपारी तीन वाजेपर्यंत हे आंदोलन सुरू होते. अखेर कंपनीच्या प्रतिनिधींनी 1 तारखेपर्यंत सर्वांचे वेतन देण्याचे आश्वासन दिल्यानंतर कामगारांनी आंदोलन मागे घेतले.

तुळजापूर नगरपरिषदेकडून समृद्धी कंपनीला मागील तीन वर्षांपासून शहरातील स्वच्छतेचे काम देण्यात आले आहे. या कामासाठी कंपनीकडून महिला व पुरुष कामगार नियुक्त करण्यात आले आहेत. मात्र, गेल्या तीन ते चार महिन्यांपासून या कामगारांचे वेतन थकीत असल्याने त्यांच्या कुटुंबीयांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. दीपावलीसारखा महत्त्वाचा सण तोंडावर असतानाही हातात पगार नसल्याने कामगारांमध्ये प्रचंड नाराजी होती.

शनिवारी सकाळी सहा वाजल्यापासून 50 ते 55 कामगारांनी नगरपरिषदेत ठिय्या आंदोलन सुरू केले. यावेळी समृद्धी कंपनीच्या प्रतिनिधींनी सुरुवातीला एक ते दोन लाख रुपये देण्याची तयारी दर्शविली. मात्र, कंपनीकडून सुमारे 20 ते 22 लाख रुपये येणे असल्याचा दावा कामगारांच्या प्रतिनिधींनी केला. त्यामुळे केवळ एक-दोन लाख रुपये स्वीकारण्यास कामगारांनी नकार दिला. संपूर्ण थकीत वेतन मिळाल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याची भूमिका त्यांनी घेतली.

दरम्यान, समृद्धी कंपनीचे पवार नावाचे प्रतिनिधी यांनी 1 तारखेपर्यंत सर्व कामगारांचे पेमेंट करण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर कामगारांनी आपले ठिय्या आंदोलन मागे घेतले. मात्र, केवळ आश्वासनावर आंदोलन मागे घेण्याची वेळ कामगारांवर आल्याने कंपनीच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त होत आहे.


दुष्काळात काम करूनही दिवाळी साधेपणाने!

एकीकडे दुष्काळी परिस्थिती, दुसरीकडे महागाई आणि त्यातच तीन ते चार महिन्यांचे वेतन थकीत असल्याने या 50 ते 55 कामगारांच्या कुटुंबीयांना यंदाची दिवाळी साधेपणाने साजरी करावी लागली. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या कामगारांनाच आपल्या कष्टाचा मोबदला वेळेवर मिळत नसल्याचे दुर्दैवी चित्र समोर आले आहे. घाम गाळून काम केल्यानंतरही वेतनासाठी नगरपरिषदेत ठिय्या आंदोलन करण्याची वेळ येणे ही कामगारांसाठी मोठी शोकांतिका ठरली आहे.


कामावर यायचे की नाही, याचा विचार करावा लागेल!

कंपनीकडून वारंवार वेतन थकविले जात असल्याने कामगारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. कंपनीने दिलेल्या आश्वासनानुसार 1 तारखेपर्यंत वेतन न मिळाल्यास कंपनीकडे कामासाठी यायचे की नाही, याचा विचार करावा लागेल, असा इशाराही कामगारांनी दिला आहे.


स्वच्छतेचा ठेका पुन्हा वादाच्या भोवऱ्यात!

दरम्यान, समृद्धी कंपनी मागील तीन वर्षांपासून तुळजापूर शहरातील स्वच्छतेचे काम करीत आहे. मात्र, कंपनीच्या स्वच्छता कामकाजाबाबत नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी होत असल्याचे सांगितले जाते. त्यातच आता कामगारांचे तीन ते चार महिन्यांचे वेतन थकीत असल्याचा प्रकार समोर आल्याने नगरपरिषदेच्या स्वच्छता ठेक्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. नगरपरिषद प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन कामगारांचे थकीत वेतन मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा, तसेच संबंधित कंपनीच्या कामकाजाची तपासणी करावी, अशी मागणी होत आहे.

 
Top