धाराशिव (प्रतिनिधी)- लग्नाच्या अवघ्या आठ महिन्यांतच वैवाहिक आयुष्याचा दुर्दैवी अंत झाल्याची धक्कादायक घटना वाशी तालुक्यात उघडकीस आली आहे. पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याचा गंभीर आरोप असून, हत्येनंतर मृतदेह कुंथलगिरी घाटातील डोंगरदरीत फेकून दिल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी वाशी पोलिसांनी पत्नी आणि तिच्या प्रियकराला ताब्यात घेतल्याची माहिती असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोविंद शिवाजी कागदे (वय 27, रा. गोलेगाव, ता. वाशी) असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याचा विवाह अवघ्या आठ महिन्यांपूर्वी झाला होता. मात्र, पत्नी अंजली आणि शुभम सुभाष खोसे यांच्यात प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून हा प्रकार घडल्याचा आरोप करण्यात आला आहे. गुरुवार, 19 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 ते 2 वाजण्याच्या सुमारास वाशी तालुक्यातील रामकुंड शिवारात सरमकुंडी ते भूम रस्त्यालगत असलेल्या कुंथलगिरी डोंगर परिसरात ही घटना घडल्याची माहिती आहे. गोविंद यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून तसेच डोक्यात दगड घालून त्यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. त्यानंतर मृतदेह डोंगरदरीत फेकून दिल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणी मृत गोविंद यांचे चुलत भाऊ ज्ञानेश्वर बाजीराव कागदे यांनी वाशी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पत्नी अंजली गोविंद कागदे आणि शुभम सुभाष खोसे यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 103(1) आणि 3(5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लग्नाला अवघे आठ महिने झालेल्या तरुणाचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने गोलेगावसह वाशी तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. या हत्येमागील नेमके कारण, गुन्ह्याचे नियोजन आणि इतर बाबींचा उलगडा करण्यासाठी वाशी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

 
Top