तुळजापूर (प्रतिनिधी)- मोबाईल घेण्यासाठी पैसे दिले नाहीत, या क्षुल्लक कारणावरून मुलाने जन्मदात्या वडिलांचाच जीव घेतल्याची संतापजनक घटना तुळजापूर तालुक्यातील येवती येथील डोंबाळे वस्तीवर घडली. श्रीशैल ऊर्फ बबलू खंडू डोंबाळे (वय 29) याने लोखंडी पाईपने वडील खंडू डोंबाळे (वय 56) यांच्या डोक्यावर वार करून त्यांची हत्या केल्याचा आरोप आहे. या घटनेने संपूर्ण परिसर हादरला असून रक्ताच्या नात्यालाही काळिमा फासला गेला आहे.


मोबाईलच्या पैशांवरून वादाची ठिणगी!

10 नोव्हेंबर रोजी रात्री जेवणानंतर श्रीशैलने वडिलांकडे मोबाईल घेण्यासाठी पैसे मागितले. पैसे नसल्याचे सांगून वडिलांनी नंतर मोबाईल घेऊन देण्याचे आश्वासन दिले. मात्र, यावरून वाद झाल्यानंतर मुलगा घराबाहेर निघून गेला.


आईच्या डोळ्यांसमोर रक्ताचा थरार!

रात्री साडेअकराच्या सुमारास घराबाहेर आवाज आणि किंकाळ्या ऐकून आई सुरेखा यांनी दरवाजा उघडला. त्यावेळी श्रीशैल लोखंडी पाईपने वडिलांच्या डोक्यावर हल्ला करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. आईला पाहताच आरोपी पळून गेला. खंडू डोंबाळे गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. नागरिकांनी त्यांना तातडीने अणदूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.


आरोपीचा कबुलीजबाब; पोलिसांकडून अटक!

आईच्या फिर्यादीनुसार, आरोपी काही वेळाने पुन्हा घटनास्थळी आला आणि मोबाईलसाठी पैसे न दिल्याने वडिलांना मारहाण केल्याचे त्याने उपस्थितांसमोर सांगितले. त्यानंतर आडोशाला लपलेल्या आरोपीचा नळदुर्ग पोलिसांनी शोध घेऊन त्याला अटक केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद कागुणे, उपनिरीक्षक अख्तर सय्यद आणि इटकळ बीटचे पोलीस अंमलदार नवनाथ चाबुकस्वार, सुदर्शन घुले व चालक मायाचारी यांनी कारवाईत सहभाग घेतला.

या प्रकरणी सुरेखा डोंबाळे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास नळदुर्ग पोलीस करीत आहेत. एका मोबाईलच्या हट्टातून जन्मदात्या वडिलांचा जीव गेल्याने येवतीसह संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.


 
Top