भूम (प्रंतिनिधी)- परंडा-वाशी परिसराच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा देऊ शकणाऱ्या प्रस्तावित पंढरपूर-कुर्डूवाडी-जालना-शेगाव रेल्वेमार्गाच्या मागणीसाठी परंडा येथे आयोजित सर्वपक्षीय बैठकीस उपस्थित राहून विविध राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी आणि रेल्वे संघर्ष समितीच्या सदस्यांशी सविस्तर चर्चा केली.
अनेक वर्षांपासून रेल्वे सुविधेच्या प्रतीक्षेत असलेल्या या परिसराला रेल्वेच्या माध्यमातून विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे अत्यंत आवश्यक आहे. हा रेल्वेमार्ग केवळ प्रवासी वाहतुकीपुरता मर्यादित नसून शेतमालाची वाहतूक, दुग्धव्यवसाय, व्यापार, उद्योग, पर्यटन आणि युवकांच्या रोजगारनिर्मितीसाठी महत्त्वपूर्ण ठरू शकतो. रेल्वेमार्गासाठी केवळ मागणी करून चालणार नाही, तर अभ्यासपूर्ण प्रस्ताव आणि नियोजनबद्ध पाठपुरावा करावा लागेल. यापूर्वी पुणे येथे भक्तिमार्गाच्या अनुषंगाने खासदार आणि संबंधित अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेचा अनुभव यावेळी उपस्थितांसमोर मांडला. रेल्वे प्रकल्पाच्या मंजुरीसाठी आवश्यक असलेल्या विविध टप्प्यांची माहिती देत प्रवासी वाहतुकीबरोबरच मालवाहतुकीची क्षमता, आर्थिक व्यवहार्यता, जनतेची मागणी आणि शेतकऱ्यांचा सहभाग या बाबींवर विशेष भर दिला.
या बैठकीला नव निर्वाचित आमदार डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी अभ्यासपूर्ण मांडणी करून पुढील काळात हा लढा कसा यशस्वी होईल या बाबत अनमोल मार्गदर्शन केले. या बैठकीत माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी रेल्वेमार्गाच्या मागणीचा ऐतिहासिक संदर्भ देत अभ्यासपूर्ण भूमिका मांडली. त्यांनी या रेल्वेमार्गासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शिफारसपत्र मिळविण्यासाठी स्वतः प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.तसेच या मागणीसाठी मी पुढाकार घ्यावा आणि सर्वपक्षीय नेते एकत्रितपणे पाठीशी उभे राहतील, अशी ग्वाही दिली. त्यांच्या सकारात्मक भूमिकेबद्दल मनःपूर्वक आभार! या महत्त्वपूर्ण प्रश्नासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी पाटील यांनी निःस्वार्थ भावनेने पुढाकार घेऊन सर्वपक्षीय नेत्यांना एकत्र आणण्याचे कार्य केले, त्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन!
बैठकीत उपस्थित सर्वपक्षीय नेत्यांनी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून या रेल्वेमार्गासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केला. प्रत्येकाने मांडलेल्या सूचना आणि भूमिका या पुढील पाठपुराव्यासाठी निश्चितच उपयुक्त ठरणार आहेत. हा प्रश्न कोणत्याही एका पक्षाचा किंवा व्यक्तीचा नाही, तर भूमपरंडावाशी परिसरातील लाखो नागरिकांच्या विकासाशी आणि भावी पिढ्यांच्या भविष्याशी जोडलेला आहे. रेल्वे संघर्ष समितीच्या पाठीशी मी कायम खंबीरपणे उभा राहीन. या मागणीसाठी केंद्र व राज्य शासनाकडे आवश्यक त्या सर्व स्तरांवर सातत्याने पाठपुरावा करणार आहे.
यावेळी माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ताआण्णा साळुंके, काँग्रेस जिल्हाध्यक्ष उमेशराजे निंबाळकर, शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख रणजित पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे व तानाजी पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष नवनाथ जगताप, रिपाई (आठवले गट) चे मराठवाडा सरचिटणीस संजयकुमार बनसोडे, वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष प्रवीण रणबागुल, माजी उपसभापती मेघराज पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विशाल ढगे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षशरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष किरण करळे, उद्योगपती रामचंद्र पवार, प्रदेश सरचिटणीस श्री. प्रवीण घोलप, ॲड. दादासाहेब खरसडे यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व रेल्वे संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष संतोष वरळे (हाय इन्फोटेक भूम) व इतर सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अलीम शेख यांनी केले.
