येडशी (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील येडशी येथे करंडे गिफ्ट सेंटर व किराणा दुकानाला लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण जिल्हा सुन्न झाला आहे. या दुर्घटनेची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गंभीर दखल घेतली असून, मृतांच्या नातेवाइकांशी मोबाईलद्वारे संवाद साधत त्यांचे सांत्वन केले. तसेच शासन स्तरावरून शक्य ती सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले.

या दुर्घटनेनंतर करंडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एकाच कुटुंबातील सहा सदस्यांचा आगीत मृत्यू झाल्याने कुटुंबीयांसह नातेवाईक आणि येडशी परिसरातील नागरिकांवर शोककळा पसरली आहे. या पार्श्वभूमीवर महसूलमंत्री बावनकुळे यांनी दादासाहेब घोडके यांना करंडे यांच्या निवासस्थानी पाठवून कुटुंबीयांची भेट घेण्यास सांगितले.

त्यानंतर महसूलमंत्री बावनकुळे यांनी मुकुंद करंडे यांच्याशी मोबाईलवरून सुमारे सहा मिनिटे संवाद साधला. यावेळी त्यांनी येडशी येथील आगीच्या दुर्घटनेची माहिती जाणून घेतली. कुटुंबीयांवर ओढवलेल्या या दुःखद प्रसंगाबद्दल संवेदना व्यक्त करत त्यांचे सांत्वन केले. तसेच शासनाच्या माध्यमातून जे काही करता येईल, ती मदत उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असा दिलासा दिला.


पुढील आठवड्यात करंडे कुटुंबीयांची भेट घेणार!

दुर्घटनेची तीव्रता आणि कुटुंबीयांची परिस्थिती लक्षात घेता, वेळ मिळाल्यास पुढील आठवड्यात प्रत्यक्ष येडशी येथे भेट देऊन करंडे कुटुंबीयांची भेट घेण्याचे आश्वासनही महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिले. या संवादामुळे दुःखात असलेल्या करंडे कुटुंबीयांना काहीसा आधार मिळाला आहे. यावेळी करंडे परिवारातील सदस्यांसह कमलाकर पाटील, हरिभाऊ जाधव आणि सोमनाथ विभूते उपस्थित होते. येडशी येथील भीषण अग्नितांडवात सहा जणांचा झालेला मृत्यू ही केवळ एका कुटुंबाची हानी नसून संपूर्ण परिसराला चटका लावणारी दुर्घटना आहे. या संकटातून सावरण्यासाठी करंडे कुटुंबीयांना शासनाकडून प्रत्यक्ष मदत मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

 
Top