धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्याच्या भ्रमण दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत निवड झालेल्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, आळणी येथे सदिच्छा भेट देऊन शाळेतील विविध शैक्षणिक उपक्रमांची व सुविधांची पाहणी केली. या विशेष प्रशिक्षणार्थी पथकामध्ये गौरव वर्मा (Indian Forest Service), रश्मी प्रधान (Indian Forest Service), यशस्वी मौर्या (Indian Forest Service) आणि ईश्वर शरण मौर्य (Indian Sankhiki Seva) यांचा समावेश होता.
या भेटीदरम्यान अधिकाऱ्यांनी शाळेतील अत्याधुनिक कॉम्प्युटर रूम, इनोव्हेटिव्ह लॅब, ॲस्ट्रॉनॉमी लॅब तसेच शाळेतील विविध शैक्षणिक सुविधांची पाहणी केली. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, तंत्रज्ञानाची आवड, संशोधनवृत्ती आणि नवोपक्रमशीलता विकसित करण्यासाठी शाळेच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती शिक्षकांनी अधिकाऱ्यांना दिली.
अधिकाऱ्यांनी शाळेच्या स्वच्छ, सुंदर आणि शैक्षणिक वातावरणाने प्रभावित होऊन शाळा परिसराची पाहणी केली. तसेच शालेय पोषण आहाराची गुणवत्ता, स्वच्छता आणि नियोजन पाहून समाधान व्यक्त केले. विद्यार्थ्यांना दिला जाणारा पौष्टिक व दर्जेदार आहार ही बाब विशेष कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले. या भेटीचे विशेष आकर्षण म्हणजे अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी साधलेला मनमोकळा संवाद! त्यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीविषयी, आवडीनिवडींविषयी, भविष्यातील ध्येयांविषयी तसेच विविध कलागुणांविषयी आस्थेने माहिती जाणून घेतली. विद्यार्थ्यांनीही उत्साहाने आपल्या कला, कौशल्ये आणि शैक्षणिक गुणवत्तेचे दर्शन घडविले. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, जिज्ञासू वृत्ती आणि गुणवत्ता पाहून अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी त्यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना चॉकलेटचे वाटप करून आनंद द्विगुणित केला.
शाळेतील विविध शैक्षणिक सुविधा, प्रयोगशील उपक्रम, विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि शिक्षकांचे प्रयत्न पाहून प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी विशेष आनंद व्यक्त केला. ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा आधुनिक तंत्रज्ञान, नावीन्यपूर्ण उपक्रम आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या माध्यमातून उल्लेखनीय कामगिरी करू शकते, याचा प्रत्यय या भेटीतून आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या शाळा भेटीतून आम्हालाही खूप काही शिकायला मिळाले, अशी भावना व्यक्त केली. या मान्यवर अधिकाऱ्यांच्या भेटीमुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली असून, त्यांच्या मनात स्पर्धा परीक्षा, उच्च शिक्षण आणि प्रशासकीय सेवेत जाण्याची नवी उमेद निर्माण झाली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ही भेट निश्चितच प्रेरणादायी आणि अविस्मरणीय ठरली. या विशेष भेटीमुळे शाळेच्या शैक्षणिक वाटचालीला नवी ऊर्जा मिळाली असून, शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी हा अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण ठरला.
