धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद धाराशिवच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागाने राष्ट्रीय डिजिटल पशुधन अभियानांतर्गत केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाकडून विशेष दखल घेण्यात आली आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष अर्चनाताई पाटील, उपाध्यक्षा उषाताई गायकवाड, कृषी व पशुसंवर्धन सभापती भाऊसाहेब खरसडे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात कृत्रिम रेतन, गर्भतपासणी आणि वासरांच्या जन्मासंबंधीच्या कामकाजाचे प्रभावी नियोजन, संनियंत्रण व अंमलबजावणी करण्यात आली. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल डॉ. दीपक मुळे, उपआयुक्त, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय, जिल्हा धाराशिव यांना उत्कृष्टता प्रमाणपत्र प्रदान करून गौरविण्यात आले आहे. त्यामुळे धाराशिव जिल्हा परिषदेच्या या शिरपेचात माना तुरा रोवला गेला आहे.
राज्यस्तरावर मिळालेला हा गौरव जिल्हा परिषद धाराशिवच्या पशुसंवर्धन विभागासाठी अभिमानाची बाब असून, पशुधन विकासाच्या क्षेत्रात जिल्ह्याने केलेल्या कामाची गुणवत्ता आणि प्रशासनाची कार्यक्षमता अधोरेखित करणारा आहे. राष्ट्रीय डिजिटल पशुधन अभियान अंतर्गत जिल्ह्यात कृत्रिम रेतन, गर्भतपासणी व वासरांच्या जन्मासंबंधी कामकाजाचे प्रभावी संनियंत्रण आणि अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा पशुसंवर्धन विभागामार्फत नियोजनबद्ध प्रयत्न करण्यात आले.
दिनांक 1 एप्रिल 2026 ते 23 ऑक्टोबर 2026 या कालावधीतील अभियानाच्या अहवालानुसार, प्रत्येक पशुवैद्यकीय चिकित्सालयासाठी प्रतिदिन 3 कृत्रिम रेतन करण्याचे निर्धारित उद्दिष्ट असताना, जिल्हा धाराशिवने प्रतिपशुवैद्यकीय चिकित्सालय प्रतिदिन सरासरी 1.89 कृत्रिम रेतन इतकी कामगिरी नोंदविली आहे. जिल्ह्यातील पशुवैद्यकीय यंत्रणेच्या माध्यमातून कृत्रिम रेतन सेवांचे प्रभावी अंमलबजावणीकरण, क्षेत्रीय स्तरावरील कामकाजाचा नियमित आढावा आणि पशुपालकांना दर्जेदार प्रजनन सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात आले. दुष्काळी परिस्थितीत पशुधन संवर्धनाला प्राधान्य दिल्यामुळे गौरविण्यात आले आहे.
उत्कृष्ट कामगिरीची राज्यस्तरावर दखल
जिल्ह्यातील पशुसंवर्धन सेवांची प्रभावी अंमलबजावणी, क्षेत्रीय कामकाजाचे नियमित संनियंत्रण आणि पशुपालकांना दर्जेदार प्रजनन सेवा उपलब्ध करून देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची दखल घेत महाराष्ट्र राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त तथा महाराष्ट्र गोजातीय प्रजनन नियमन प्राधिकरण, पुणे यांच्या वतीने उत्कृष्टता प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.