धाराशिव (प्रतिनिधी)- फार्मसी क्षेत्रातील विद्यार्थ्यांचे ज्ञान, कौशल्य, सर्जनशीलता आणि सामाजिक आरोग्याप्रती असलेली जबाबदारी वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया, नवी दिल्ली यांच्या वतीने एमजीएम विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रीय फार्मसी सप्ताह 2026 चे भव्य आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट प्रतिजैविक प्रतिरोधकता या जागतिक आरोग्य समस्येविषयी समाजामध्ये व्यापक जनजागृती निर्माण करणे हे होते.अशा राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग हा केवळ स्पर्धांपुरता मर्यादित नसून त्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतो. विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी, प्राध्यापक आणि फार्मसी क्षेत्रातील मान्यवर यांच्याशी संवाद साधण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळते. त्यातून नवीन संकल्पना, वैज्ञानिक दृष्टिकोन, संघभावना, नेतृत्वगुण, सर्जनशील विचारशक्ती आणि आत्मविश्वास विकसित होण्यास मदत होते. विशेषतः प्रत्यक्ष समाजाशी निगडित आरोग्यविषयक समस्यांवर आधारित उपक्रमांमध्ये सहभाग घेतल्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या व्यावसायिक ज्ञानाचा उपयोग समाजहितासाठी कसा करता येईल, याची जाणीव निर्माण होते. हे महत्त्व लक्षात घेऊन राष्ट्रीय उपक्रमामध्ये तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, धाराशिव येथील फार्मसी विभागाच्या 30 विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदविला होता.विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील व्यासपीठावर आपले ज्ञान, कल्पकता, कलागुण आणि संवादकौशल्य सादर करण्याची संधी उपलब्ध झाली. विविध स्पर्धा आणि उपक्रमांमध्ये सहभागी होत विद्यार्थ्यांनी केवळ आपले वैयक्तिक कौशल्य प्रदर्शित केले नाही, तर फार्मसी क्षेत्रातील सामाजिक बांधिलकी आणि जनजागृतीचे महत्त्वही अधोरेखित केले.
विशेषतः सिटून चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांनी प्रतिजैविक प्रतिरोधकतेसारख्या गंभीर वैज्ञानिक विषयाची माहिती चित्रकला, कल्पक संकल्पना आणि प्रभावी संदेशांच्या माध्यमातून मांडली. विज्ञान आणि कलेचा सुंदर संगम साधत सामान्य नागरिकांपर्यंत आरोग्यविषयक संदेश सहज व प्रभावीपणे पोहोचविण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी केला. या स्पर्धेत साक्षी डांगे आणि देवकी जाधव यांनी उत्कृष्ट कामगिरी करत पारितोषिक प्राप्त केले. त्यांच्या या यशामुळे संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला.
याशिवाय साबा कुरेशी, मयूर बोराडे, प्रथमेश दंतकाळे, कार्तिक खरगे, संकेत राठोड, मनोज सुरवसे, जाहिर शेख, नागेश मुखडे, स्नेहा नलावडे, साक्षी नेपते, वैष्णवी माते, कोमल लेंगुळे, अक्षया पाटील, शंतनू जाधव, आस्था राजपूत, अंकिता मोरे, अभिलाषा मोरे, प्रतीक्षा जगताप, अंकिता कस्तुरे, मानसी सावंत आणि इतर सहभागी विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदविला. या सर्व विद्यार्थ्यांना फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाच्या वतीने सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी संस्थेचे प्राचार्य डॉ. व्ही. व्ही. माने यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना सांगितले, “विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबरच अशा राष्ट्रीय स्तरावरील उपक्रमांमध्ये सहभाग घेणे अत्यंत आवश्यक आहे. अशा व्यासपीठांमुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळतो, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास आणि नेतृत्वक्षमता विकसित होते. भावी फार्मासिस्ट म्हणून प्रतिजैविकांचा योग्य वापर आणि प्रतिजैविक प्रतिरोधकतेविषयी समाजामध्ये जनजागृती करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी विद्यार्थ्यांनी स्वीकारली पाहिजे.“
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. पद्मसिंह पाटील, महाराष्ट्र शासनाच्या ‘मित्रा' संस्थेचे उपाध्यक्ष व संस्थेचे विश्वस्त आमदार श्री. राणाजगजितसिंह पाटील, विश्वस्त श्री. मल्हार पाटील, संस्थेचे सर्व विश्वस्त आणि संस्थेचे व्यवस्थापकीय समन्वयक प्रा. गणेश भातलवंडे,प्राचार्य डॉ. व्ही. व्ही. माने, फार्मसीविभागप्रमुख डॉ. प्रीती टी. माने सह सर्व विभाग प्रमुख यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकवृंद आणि विद्यार्थ्यांनी विजेत्यांचे कौतुक करून त्यांना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमामध्ये प्राचार्य डॉ. व्ही. व्ही. माने, फार्मसी विभागप्रमुख डॉ. प्रीती माने तसेच उपक्रम समन्वयक डॉ. आर. बी. ननावरे, डॉ. एम. ए. जे. शेख, प्रा. एस. जे. नलगे, प्रा. ए. आय. काझी, प्रा. आर. एस. हिंगमिरे आणि प्रा. ए. एम. शेख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व प्रोत्साहन दिले.
राष्ट्रीय फार्मसी सप्ताहातील या सहभागामुळे तेरणा फार्मसीच्या विद्यार्थ्यांना आपल्या शैक्षणिक ज्ञानाला व्यावहारिक अनुभवाची जोड देण्याची, राष्ट्रीय स्तरावर स्वतःची ओळख निर्माण करण्याची आणि समाजाच्या आरोग्यविषयक प्रश्नांप्रती संवेदनशील राहण्याची प्रेरणा मिळाली. अशा उपक्रमांमधून सक्षम, जागरूक, सर्जनशील आणि सामाजिक बांधिलकी जपणारे भावी फार्मासिस्ट घडविण्याच्या दिशेने विभागाने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे.
