धाराशिव (प्रतिनिधी)- रुपामाता उद्योग समूहाच्या कार्यपद्धतीमध्ये गुणवत्ता, कार्यक्षमता, उत्पादनातील सातत्य आणि उत्कृष्ट कामगिरीला नेहमीच प्राधान्य दिले जाते. समूहातील सर्व युनिटमध्ये सकारात्मक स्पर्धा निर्माण व्हावी, कामकाजाचा दर्जा उंचावावा आणि उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने दरवर्षी कामगिरीचे मूल्यांकन करून विशेष पारितोषिक दिले जाते. याच उपक्रमांतर्गत सन 2025-26 च्या गळीत हंगामातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल रुपामाता नॅचरल शुगर युनिट क्र. 03, देवसिंगा, ता. तुळजापूर, जि. धाराशिव येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी 7 लाख रुपयांचे विशेष बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
रुपामाता उद्योग समूहाचे संस्थापक ॲड. व्यंकटराव गुंड पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कार्यकारी संचालक ॲड. अजित गुंड पाटील यांच्या नेतृत्वाखाली समूहातील युनिट क्र. 01, 02 व 03 यांच्या कामगिरीचे दरवर्षी काटेकोरपणे मूल्यांकन केले जाते. यामध्ये साखर उतारा, ऊस गाळपाची कार्यक्षमता, साखरेचा दर्जा व गुणवत्ता, उत्पादनातील सातत्य, यंत्रसामग्रीची कार्यक्षमता, देखभाल-दुरुस्ती तसेच कारखान्याचा बंद कालावधी नियंत्रित ठेवणे अशा महत्त्वपूर्ण तांत्रिक व व्यवस्थापकीय बाबींचा विचार केला जातो.
या निकषांच्या आधारे उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या युनिटला 10 लाख रुपयांपर्यंतचे बक्षीस देण्याची तरतूद आहे. यंदाच्या मूल्यांकनात देवसिंगा येथील युनिट क्र. 03 ने उल्लेखनीय कामगिरी नोंदवत 7 लाख रुपयांचे विशेष बक्षीस प्राप्त केले आहे. दरम्यान, दीपावली सणाचे औचित्य साधून रुपामाता उद्योग समूहातील सर्व युनिटमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस वितरित करण्यात आला आहे.

