धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यासाठी नवसंजीवनी ठरणाऱ्या कृष्णा मराठवाडा सिंचन या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम आता निर्णायक टप्प्यावर आहे. सर्व आवश्यक कामे पूर्ण झाल्यामुळे 1 टीएमसी पाणी तर आत्ताच मिळणार आहे व बोगद्याचे शिल्लक असलेले दहा टक्के कामही प्रत्यक्ष सुरू होत आहे. येत्या पावसाळ्यापूर्वी ते पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. मात्र, प्रकल्प पूर्णत्वाकडे जात असल्याची चाहूल लागताच आतापर्यंत शांत बसलेल्या विरोधकांना अचानक जाग आली असून, श्रेय घेण्यासाठी त्यांची केविलवाणी धडपड सुरू झाली आहे.

वर्षानुवर्षे तांत्रिक, कायदेशीर आणि आर्थिक अडथळ्यांच्या गर्तेत अडकलेल्या या प्रकल्पाला गती देण्याचे काम महायुती सरकारने केले. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी स्वतः या प्रकल्पात लक्ष घालून 11 हजार कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता दिली. तब्बल चार हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. तसेच प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. त्यामुळेच रखडलेल्या प्रकल्पाच्या पूर्णत्वाचा मार्ग मोकळा झाला.

आमचे नेते आमदार राणाजगजितसिंह पाटील, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी या प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा केला. केवळ निवेदने देऊन किंवा प्रसिद्धी मिळवून थांबण्याऐवजी प्रकल्पातील प्रत्येक तांत्रिक, प्रशासकीय आणि आर्थिक अडथळा दूर करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. मुख्यमंत्री स्तरावर सातत्याने पाठपुरावा करून सुधारित प्रशासकीय मान्यता, निधीची तरतूद आणि काम पूर्ण करण्यासाठी कालबद्ध कृती कार्यक्रम निश्चित करून घेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

आता प्रकल्प निर्णायक टप्प्यावर पोहोचला असताना काही मंडळींना अचानक या प्रकल्पाची आठवण झाली आहे. कोणाचा तरी व्हिडिओ प्रसिद्ध झाला किंवा सचिवालयातून काम सुरू होण्याची माहिती मिळाली की लगेच श्रेयासाठी पुढे येण्याची ही केविलवाणी धडपड जनतेच्या लक्षात येत आहे. आजवर या प्रकल्पातील अडथळे दूर करण्यासाठी स्वतः नेमका कोणता पाठपुरावा केला, कोणती प्रशासकीय मान्यता मिळवून दिली आणि किती निधी उपलब्ध करून दिला, याचा हिशेब विरोधकांनी जनतेसमोर मांडावा.

दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी धाराशिवसाठी एक टीएमसी पिण्याच्या पाण्याला मंजुरी दिली आहे. पुढील आवर्तनात हे पाणी घाटणे बॅरेजमार्गे रामदरा तलावात आणण्याचे नियोजन आहे. योजना क्रमांक दोनच्या पाचही टप्प्याचे काम 100 टक्के पूर्ण झाल्याने पाणी आणण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा पार झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाला मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. एकीकडे बोगदा प्रकल्प पूर्णत्वाच्या उंबरठ्यावर आहे, तर दुसरीकडे पाणी आणण्याच्या दृष्टीनेही ठोस कार्यवाही सुरू आहे. या घडामोडींमुळे जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे. गंभीर दुष्काळी परिस्थितीत लोकप्रतिनिधी म्हणून नागरिकांचे मनोबल वाढवणे आणि त्यांना दिलासा देणे आवश्यक असताना, उलट त्यांच्या मनात संभ्रम निर्माण करून मनोधैर्य खच्ची करण्याचा प्रयत्न करणे अत्यंत खेदजनक आहे.

धाराशिवच्या विकासासाठी केवळ घोषणा नव्हे, तर निर्णय, निधी आणि प्रत्यक्ष काम महत्त्वाचे असते. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने या तिन्ही आघाड्यांवर निर्णय घेतल्यामुळेच हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आता पूर्णत्वाकडे वाटचाल करत आहे. डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांचे आणि धाराशिव जिल्ह्यातील जनतेचे अनेक वर्षांचे स्वप्न आता प्रत्यक्षात साकार होण्याच्या टप्प्यात आले आहे. अशा वेळी श्रेयवादाच्या राजकारणापेक्षा प्रकल्प वेळेत पूर्ण होणे आणि जनतेला त्याचा लाभ मिळणे महत्त्वाचे आहे. प्रकल्पासाठी कोणी काय केले, कोणाचा किती वाटा आहे, याचा फैसला जनताच करेल. मात्र, इतिहासात नोंद होईल ती प्रकल्प रखडवणाऱ्या चर्चांची नव्हे, तर सगळे अडथळे दूर करून तो पूर्णत्वास नेण्यासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली घेतलेल्या निर्णयांची आणि केलेल्या सकारात्मक कामांची.

 
Top