तुळजापूर (प्रतिनिधी)-  तीर्थक्षेत्र तुळजापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बोरी-नळदुर्ग पाणी प्रकल्पात ऐन पावसाळ्यात अवघा 6 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिल्याने आगामी श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. नवरात्र काळात शहरात   भाविक दाखल होणार असल्याने भाविकांची वर्दळ असलेल्या भागात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन नगरपरिषदेने केले आहे.

मागील वर्षी बोरी प्रकल्प 100 टक्के भरला होता. मात्र, उपलब्ध पाणीसाठ्या कडे  पाटबंधारे व नगरपरिषद विभागांनी दुर्लक्ष केल्या ने ज्यादा पाणी सोडून दिल्याने यंदा पावसाळ्यातच प्रकल्पातील पाणीसाठा मोठ्या प्रमाणात घटला आहे. याचा फटका शहरवासीयांना व भाविकांना पाणीटंचाई रूपात बसत आहे. त्यामुळे नवरात्रोत्सव काळात भाविकांसह शहरवासीयांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. तुळजापूर शहरात एकूण 23 बोअरवेल असून त्यापैकी केवळ 10 बोअरवेल सध्या सुरू आहेत, तर 13 बोअरवेल बंद आहेत. बंद असलेल्या बोअरवेल सुरू करण्यासाठी नगरपरिषदेकडून प्रयत्न सुरू असून, त्या लवकरच कार्यान्वित करण्याची माहिती पाणीपुरवठा सभापती सागर कदम यांनी दिली.


पाचुंदा तलावातील साठ्याचा वापर

शहरातील पाचुंदा तलावात सध्या अंदाजे 22 ते 23 टक्के पाणीसाठा आहे. या पाण्याचा दुष्काळी परिस्थितीत वापर करण्याचे नियोजन नगरपरिषदेकडून करण्यात येत आहे. तसेच रामदा रा तलावातील नैसर्गिक पाणीसाठ्याचा वापर करून तो पाइपलाइनद्वारे तुळजापूर शहराला उपलब्ध करून देण्याबाबतही नगरपरिषद प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात आले.


कृष्णा खोऱ्याच्या पाण्याची आशा

दरम्यान, घाटणे बॅरेज येथून कृष्णा खोऱ्याचे पाणी रामदरा तलावात आणण्याचे नियोजन असल्याने भविष्यात या पाण्याचा तुळजापूर शहराला लाभ होण्याची शक्यता आहे. मात्र, सध्याची पाणीटंचाई आणि नवरात्रोत्सवातील मोठी भाविकांची गर्दी लक्षात घेता नगरपरिषदेसमोर पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. नवरात्रोत्सवात लाखो भाविक शहरात येण्याची शक्यता असताना बोरी प्रकल्पातील अत्यल्प पाणीसाठा आणि बंद असलेल्या बोअरवेल यामुळे पाण्याचे काटेकोर नियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे.


 
Top