तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवापूर्वीच्या मंचकी निद्रेस शनिवारी (दि. 3) रात्री भाद्रपद वद्य अष्टमीला प्रारंभ झाला. देवीची ही मंचकी निद्रा अश्विन शुद्ध प्रतिपदेच्या पहाटेपर्यंत असणार आहे. नवरात्रोत्सवापूर्वी देवीच्या मुख्य मूर्तीला विश्रांती देऊन निद्रिस्त करण्याची शेकडो वर्षांची प्राचीन परंपरा तुळजाभवानी मंदिरात आजही जपली जात आहे.
मंचकी निद्रेच्या सोहळ्याची पूर्वतयारी सकाळपासूनच मंदिरात सुरू झाली. हजारो सुवासिनी महिलांनी देवीच्या गादीचा कापूस पिंजण्यासाठी मंदिरात गर्दी केली. प्रारंभी गादीच्या कापसाची हळद-कुंकवाने पूजा करण्यात आली. त्यानंतर सुवासिनी आराधिनींनी एकमेकींना कुंकू लावत देवीची गाणी म्हणत कापूस स्वच्छ करण्यास सुरुवात केली. कापूस स्वच्छ झाल्यानंतर मंदिर संस्थानच्या वतीने सुवासिनींची खणाने ओटी भरण्यात आली.
यानंतर मुस्लिम धर्मीय पिंजारी समाजातील शेख कुं टुबियांनी यांनी देवीच्या गादीचा कापूस पिंजून दिला. त्यानंतर नकाते कुटुंबीयांनी गादीमध्ये कापूस भरून ती मंचकी निद्रेसाठी सज्ज केली. पलंगे कुटुंबीयांनी चांदीच्या पलंगावर सुताच्या दोन ते अडीच इंच रुंदीच्या पट्ट्या तयार करून त्या पलंगाला घट्ट बांधल्या. त्यावर तीन गाद्या अंथरण्यात आल्या आणि देवीच्या मंचकी निद्रेसाठी शयनगृह सज्ज करण्यात आले.
सायंकाळी देवीचा पंचामृत अभिषेक व पूजा झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ करून अत्यंत भक्तिभावाने अलगद उचलण्यात आली. त्यानंतर देवीची मूर्ती शेजघरातील चांदीच्या पलंगावर निद्रिस्त करण्यात आली. देवीच्या कपाळावर चंदनाचा मळवट भरण्यात आला. मंचकी निद्रेच्या काळात देवीला केवळ सोन्याचे नेत्र आणि नथ एवढेच सुवर्णालंकार धारण केले जातात. त्यानंतर देवीच्या मूर्तीवर साड्या अंथरून त्यावर मखमली रजई टाकण्यात आली.
या सोहळ्यास जिल्हाधिकारी किरण पुजार प्रशासकीय व्यवस्थापक तथा तहसीलदार माया माने, महंत, मंदिर समितीचे ट्रस्टी, धार्मिक व प्रशासकीय व्यवस्थापक तसेच मंदिर संस्थानचे कर्मचारी उपस्थित होते. त्यानंतर देवीला नैवेद्य दाखवून आरती व प्रक्षाळ पूजा करण्यात आली आणि मंदिर बंद करण्यात आले.
नवरात्रासाठी मंदिर प्रशासनाची लगबग
मंचकी निद्रेच्या काळात देवीला सुगंधी तेलाचे अभिषेक घातले जातात. या काळात देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या तुलनेने कमी असते. त्यामुळे मंदिर प्रशासन, संबंधित विभाग, पुजारीवर्ग, शहरातील व्यावसायिक आणि स्थानिक यंत्रणा शारदीय नवरात्रोत्सवाच्या तयारीला वेग देतात. मंचकी निद्रा सुरू झाल्यानंतर देवीभक्त आणि स्थानिक पुजारीवर्गाकडूनही विश्रांतीच्या काळात गादी व उशीचा वापर न करण्याची परंपरा पाळली जाते. नवरात्रोत्सवाच्या धामधुमीपूर्वी आई तुळजाभवानीला दिली जाणारी ही विश्रांती तुळजापूरच्या धार्मिक परंपरेतील वैशिष्ट्यपूर्ण सोहळा मानला जातो.
11 ऑक्टोबरला सिंहासनाधिष्ठापना
मंचकी निद्रेतील देवीची मूळ मूर्ती अश्विन शुद्ध प्रतिपदा, रविवार (दि. 11 ऑक्टोबर) रोजी पहाटे पुन्हा सिंहासनाधिष्ठित केली जाणार आहे. त्यानंतर दुपारी 12 वाजता सिंह गाभाऱ्यात ईशान्य दिशेला घटस्थापना करण्यात येणार असून, त्यानंतर श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्रोत्सवाला विधिवत प्रारंभ होणार आहे.
