धाराशिव (प्रतिनिधी)-  पावसाअभावी निर्माण होणारी पाणीटंचाई,जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न आणि शेतकरी व शेतमजुरांच्या रोजगाराची चिंता लक्षात घेऊन संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी भूम तालुका प्रशासन सज्ज झाले आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागू नये. पशुधनासाठी पुरेसा चारा उपलब्ध व्हावा आणि गरजूंच्या हाताला गावातच काम मिळावे,यासाठी विविध उपाययोजनांना प्राधान्य देण्यात येत आहे. दुष्काळी परिस्थितीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी सतर्क राहून परस्पर समन्वयाने काम करावे,अशा सूचना भूम तालुक्याचे दुष्काळ निवारण नोडल अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर यांनी दिल्या.

भूम येथील पंचायत समितीच्या सभागृहात 24 ऑक्टोबर रोजी आयोजित दुष्काळ निवारण आढावा बैठकीत ते बोलत होते.या बैठकीला उपविभागीय अधिकारी श्रीमती.ज्योती चौहान,तहसीलदार जयवंत पाटील,गटविकास अधिकारी वाझे,तालुका कृषी अधिकारी,जलसंपदा व पाटबंधारे विभागाचे अधिकारी,तालुका पशुवैद्यकीय अधिकारी यांच्यासह तालुक्यातील सर्व ग्राम महसूल अधिकारी,ग्रामपंचायत अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी आणि पोलीस पाटील उपस्थित होते. दुष्काळाची झळ सर्वाधिक ग्रामीण भागातील शेतकरी,शेतमजूर आणि पशुपालकांना बसत असल्याने त्यांच्या अडचणींचा वेळीच विचार करून उपाययोजना राबविणे आवश्यक आहे.त्यादृष्टीने तालुक्यातील प्रत्येक गावाची सद्यस्थिती जाणून घेणे,पिण्याच्या पाण्याची उपलब्धता तपासणे आणि भविष्यात निर्माण होऊ शकणाऱ्या पाणीटंचाईचे पूर्वनियोजन करणे,या बाबींवर बैठकीत विशेष भर देण्यात आला.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर यांनी उपस्थित गावस्तरीय नोडल अधिकाऱ्यांना दुष्काळ निवारणाच्या अनुषंगाने सोपविण्यात आलेल्या जबाबदाऱ्यांविषयी मार्गदर्शन केले. तसेच दुष्काळी परिस्थितीत काम करताना वैयक्तिक आरोग्याची काळजी घेण्याचे महत्त्वही त्यांनी विशद केले.गावपातळीवरील अधिकारी व कर्मचारी हे प्रशासन आणि नागरिक यांच्यातील महत्त्वाचा दुवा असल्याने त्यांनी आपल्या जबाबदाऱ्या सजगतेने पार पाडणे आवश्यक असल्याचे बैठकीत अधोरेखित करण्यात आले.

 
Top