तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी भाविक वेगवेगळ्या पद्धतीने आपली श्रद्धा आणि भक्ती अर्पण करतात. मात्र, विजापूर येथील तीन देवीभक्तांनी गुडघ्यांवरून प्रवास करत घाटशेळीच्या अवघड पायऱ्या चढून देवीचरणी आपली सेवा अर्पण केली. त्यांच्या या अनोख्या भक्तीने अश्विनी पौर्णिमेच्या वारीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले असून, त्यांच्या श्रद्धेची परिसरात चर्चा सुरू आहे.

आई तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी विजापूर येथून आलेल्या या तीन भक्तांनी नेहमीच्या मार्गाने चालत जाण्याऐवजी गुडघ्यांवरून मार्गक्रमण करण्याचा संकल्प केला. वाटेतील अवघड चढण आणि घाटशेळीच्या पायऱ्यांचे आव्हान स्वीकारत त्यांनी आपली वारी पूर्ण केली. शारीरिक कष्टांची पर्वा न करता देवीप्रती असलेली श्रद्धा आणि सेवाभाव जपत त्यांनी देवीच्या चरणी नतमस्तक होत आपली सेवा अर्पण केली. या भक्तांच्या वारीदरम्यान त्यांच्यासोबत असलेल्या सहभक्तांनीही माणुसकीचे दर्शन घडवले. गुडघ्यांवरून प्रवास करणाऱ्या या भाविकांना उन्हाचा आणि थकव्याचा त्रास होऊ नये, यासाठी सहभक्त आपल्याजवळील कपड्याने त्यांना वारा घालत होते.

 
Top