धाराशिव (प्रतिनिधी)- नगर परिषद धाराशिवच्या वतीने शहरातील 18 वर्षांवरील एकल महिलांचे सर्वेक्षण सुरू असुन,या सर्वेक्षणापासून कोणतीही महिला वंचित राहू नये,यासाठी पात्र महिलांनी आवश्यक कागदपत्रांसह फॉर्म भरून जमा करावा,असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते तथा तालुकास्तरीय मिशन वात्सल्य समिती सदस्य गणेश वाघमारे यांनी केले आहे.
गणेश वाघमारे यांनी नगर परिषद धाराशिव येथील एकल महिला विभागाच्या अधिकारी वैशाली आवाड यांच्याशी चर्चा करून आतापर्यंत जमा झालेल्या फॉर्मची माहिती घेतली. यावेळी त्यांनी सांगितले की, “सर्वेक्षणाचा उद्देश केवळ भविष्यातील लाभ मिळविणे एवढाच नसुन,एकल महिलांची शासनाच्या दप्तरी अधिकृत नोंद होणेही महत्त्वाचे आहे.त्यामुळे कोणतीही एकल महिला वंचित राहु नये, यासाठी पात्र महिलांनी फॉर्म भरून द्यावा.” या सर्वेक्षणात विधवा, परित्यक्ता, घटस्फोटित व अविवाहित अशा 18 वर्षांवरील एकल महिलांचा समावेश करण्यात येत आहे.
दरम्यान,एकल महिलांना आर्थिक अथवा इतर कोणते लाभ मिळणार आहेत. याबाबत शासनाकडुन अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे “सर्वेक्षण केल्यानंतर अमुक लाभ मिळणार आहे” असे सांगून कोणी पैशांची मागणी करीत असल्यास त्यांच्या भूलथापांना बळी पडू नये. तसेच सामाजिक क्षेत्रातील संस्था संघटना यांनी आपापल्या पद्धतीने एकल महिलांचे सर्व्हेक्षणात सहभागी होऊन फॉर्म विषयी सहकार्य करावे असे आवाहन वैशाली आवाड यांनी केले आहे. सर्वेक्षणासाठी महिलांनी नगर परिषद धाराशिव येथील एकल महिला विभागात फॉर्म भरून जमा करावा. त्यासाठी फोटो,आधार कार्डची छायांकित प्रत,घटस्फोटित महिलांसाठी कायदेशीर घटस्फोटाचा कागदपत्र पुरावा,विधवा महिलांसाठी पतीचे मृत्यू प्रमाणपत्र तसेच अविवाहित व परित्यक्ता महिलांसाठी स्वयंघोषणापत्र जोडणे आवश्यक आहे.अशी माहिती वैशाली आवाड यांनी दिली.
