धाराशिव (प्रतिनिधी)- कर्जाच्या ओझ्याखाली असलेल्या शेतकऱ्यांना ऐन सणासुदीच्या काळात मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026'अंतर्गत 1 ऑक्टोबर 2026 रोजी धाराशिव जिल्ह्यातील 15 हजार 787 पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर 167 कोटी 46 लाख रुपये कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात आली.राज्यातील 3.27 लाख पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर सुमारे 3 हजार 160 कोटी 44 लाख रुपये जमा करण्यात आले आहेत.
कर्जमुक्तीच्या या रकमेने हजारो शेतकरी कुटुंबांना आर्थिक आधार मिळाला आहे.दरम्यान,प्रसिद्ध झालेल्या सर्व याद्यांतील ज्या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण अद्याप बाकी आहे,त्यांनी ते तातडीने पूर्ण करावे,असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर संबंधित पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर शासनाकडून लाभाची रक्कम जमा करण्यात येणार आहे. या योजनेतील कर्जमुक्ती आणि एकवेळ समझोता या घटकांच्या अंमलबजावणीसाठी राज्यातील 30 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका,12 राष्ट्रीयीकृत बँका आणि अन्य खासगी बँका अशा एकूण 53 बँकांनी पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या सुमारे 32 लाख कर्जखात्यांची माहिती महा-आयटीमार्फत विकसित करण्यात आलेल्या पोर्टलवर अपलोड केली आहे. यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील 97 हजार 873 पात्र लाभार्थी शेतकऱ्यांचा समावेश आहे.
योजनेच्या निकषांनुसार पात्र ठरलेल्या थकबाकीदार शेतकऱ्यांपैकी राज्यातील सुमारे 20.15 लाख पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची यादी आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे.त्यापैकी 30 सप्टेंबर 2026 अखेर 17.21 लाख शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. जिल्ह्यातील सुमारे 67 हजार 619 थकबाकीदार शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध झाली असून,आजअखेर त्यापैकी 55 हजार 363 शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण केले आहे.
एकाच दिवशी जिल्ह्यात 167 कोटींचा लाभ
1 ऑक्टोबर 2026 रोजी राज्यातील 3.27 लाख पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर 3 हजार 160 कोटी 44 लाख रुपये जमा करण्यात आले.यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील 15 हजार 787 पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर 167 कोटी 46 लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. दरम्यान,30 सप्टेंबर 2026 अखेर आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या राज्यातील सुमारे 15.86 लाख पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात 13 हजार 276 कोटी रुपये ऑनलाइन पोर्टलद्वारे थेट जमा करण्यात आले आहेत.यामध्ये जिल्ह्यातील 49 हजार 794 पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात 457 कोटी 18 लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. त्यापैकी धाराशिव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 4 हजार 7 पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या 25 कोटी 83 लाख रुपयांच्या रकमेचा समावेश आहे.