परंडा (प्रतिनिधी)- ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी, त्यांच्या अनुभवाचा सन्मान, सामाजिक सुरक्षितता तसेच निरोगी, सक्रिय आणि सन्मानपूर्वक वृद्धत्वाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने उपजिल्हा रुग्णालय, परंडा येथे 1 ऑक्टोबर 2026 रोजी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

हा कार्यक्रम जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय चाकूरकर यांच्या आदेशानुसार तसेच वैद्यकीय अधीक्षक डॉ.जुबेर मोमीन यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.कार्यक्रमास रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी,अधिकारी-कर्मचारी तसेच परंडा पंचक्रोशीतील आरोग्याविषयी जागरूक असलेले नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सहअधीक्षक चंद्रभान पवार, डॉ.आरती कुलकर्णी ,डॉ.गजानन शेटे, डॉ.अमजद पठाण, डॉ. आनंद मोरे, डॉ.रोहित बोराडे, फार्मसी ऑफिसर  जितेंद्र ओव्हाळ, रामचंद्र झिंगे, आरोग्य सेवक किशोर जगताप, अनिल भोसले, इन्चार्ज सिस्टर श्रीमती कोल्हे, श्रीमती केसकर तसेच रुग्णालयातील इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. ज्येष्ठ नागरिक म्हणजे समाजाची अनुभवसंपन्सं संपत्ती कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ नागरिकांकडे केवळ वयस्क व्यक्ती म्हणून न पाहता अनुभव, ज्ञान, संस्कार आणि सामाजिक शहाणपणाची संपत्ती म्हणून पाहण्याची गरज अधोरेखित करण्यात आली.

महाभारतातील अत्यंत अर्थपूर्ण विचाराचा संदर्भ देताना सांगण्यात आले. “न सा सभा यत्र न सन्ति वृद्धाः । न ते वृद्धा ये न वदन्ति धर्मम्‌‍ ”अर्थात, ज्या सभेत ज्येष्ठ व अनुभवी व्यक्ती नाहीत, ती सभा पूर्ण अर्थाने सभा नव्हे; आणि जे ज्येष्ठ सत्य, नीती व धर्माचे मार्गदर्शन करीत नाहीत, ते केवळ वयाने ज्येष्ठ असले तरी त्यांच्या ज्येष्ठत्वाचा खरा अर्थ पूर्ण होत नाही. या विचारातून ज्येष्ठ नागरिकांचे समाजातील स्थान किती महत्त्वाचे आहे, हे स्पष्ट होते. ज्येष्ठांचा अनुभव ही पुढील पिढीसाठी एक अमूल्य शिदोरी असून, त्यांच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा उपयोग समाजाच्या प्रगतीसाठी करून घेणे आवश्यक असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

 “वय वाढणे म्हणजे आजार वाढणे नव्हे”  ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याविषयी जनजागृती करताना निरोगी वृद्धत्व ही संकल्पना स्पष्ट करण्यात आली. वय वाढणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे; मात्र वाढत्या वयासोबत आरोग्याची योग्य काळजी, नियमित तपासणी, संतुलित आहार, शारीरिक हालचाल, मानसिक स्वास्थ्य आणि सामाजिक सहभाग याकडे लक्ष दिल्यास ज्येष्ठ व्यक्ती अधिक सक्रिय व स्वावलंबी जीवन जगू शकतात.ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष नियमित रक्तदाब व रक्तातील साखर तपासणी, दृष्टी व श्रवणाची तपासणी,औषधांचा योग्य व नियमित वापर, संतुलित व पोषक आहार, वय व आरोग्यस्थितीनुसार नियमित व्यायाम, योग व प्राणायाम,पडणे टाळण्यासाठी घरातील सुरक्षित व्यवस्था, स्मरणशक्ती व मानसिक आरोग्याकडे लक्ष,सामाजिक व कौटुंबिक सहभाग,

आवश्यकतेनुसार नियमित वैद्यकीय सल्ला, या बाबींना विशेष महत्त्व देण्याचा संदेश देण्यात आला.

“निरोगी वृद्धत्वासाठी प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा महत्त्वाची”ज्येष्ठांच्या आरोग्यामध्ये आजार झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा आजार व गुंतागुंत टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा अधिक महत्त्वाची असल्याचे यावेळी सांगण्यात आले. ज्येष्ठ व्यक्तींनी स्वतःच्या आरोग्याची नियमित नोंद ठेवणे, घेत असलेल्या औषधांची माहिती व्यवस्थित ठेवणे आणि कोणताही त्रास जाणवल्यास स्वतःहून औषधोपचार न करता वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.

 
Top