धाराशिव (प्रतिनिधी)-  जिल्ह्यात यावर्षी गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, शासनाने जिल्ह्यातील सर्व आठही तालुक्यांचा दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये समावेश केला आहे. जिल्ह्याची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून असल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकरी व ग्रामीण भागातील नागरिकांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. या पार्श्वभूमीवर दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना दिलासा मिळावा, यासाठी शासनाने परीक्षा शुल्क माफीसंदर्भात निर्देश दिले आहेत. असे असताना विद्यार्थ्यांकडून सक्तीने परीक्षा शुल्क वसूल करणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई करा अशी मागणी संजय पाटील दुधगावकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. 

धाराशिव जिल्ह्यातील काही महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांकडून सध्या सुरू असलेल्या सेमिस्टरची तसेच आगामी मार्च-एप्रिल परीक्षेची शुल्क आकारणी सक्तीने केली जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. विशेषतः शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांवर अशा प्रकारे आर्थिक भार टाकला जात आहे. त्यामुळे शासनाच्या परीक्षा शुल्क माफीच्या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांना स्पष्ट निर्देश द्यावेत. शासनाच्या निर्देशांचे उल्लंघन करून सक्तीने परीक्षा शुल्क वसूल करणाऱ्या महाविद्यालयांची चौकशी करून त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करावी. तसेच विद्यार्थ्यांकडून यापूर्वी वसूल केलेले परीक्षा शुल्क तात्काळ परत करण्याचे आदेश संबंधित महाविद्यालयांना द्यावेत. यासंदर्भात तत्काळ कार्यवाही न केल्यास तीव्र आंदोलन केले जाईल. असा इशाराही संजय पाटील दुधगांवकर यांनी दिला आहे. 


 
Top