धाराशिव (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे सख्खे साडू ॲड. रविंद्र नागरगोजे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. मुंबईतील टिळक भवन येथे 1 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र काँग्रेसचे नवनियुक्त प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. नागरगोजे यांच्या काँग्रेस प्रवेशाची धाराशिव जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू आहे.
या वेळी खासदार महाराष्ट्राचे प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार, रेहाना चिस्ती मॅडम, भानुदास माळी, श्रीनिवास बिक्कड, धाराशिव जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष उमेशराजे निंबाळकर, ओबीसी प्रदेश काँग्रेसचे सचिव पांडुरंग कुंभार, प्रदेश सरचिटणीस मलंग शेख यांच्यासह काँग्रेसचे अनेक नेते व पदाधिकारी उपस्थित होते. धाराशिव जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष उमेशराजे निंबाळकर आणि प्रदेश काँग्रेसचे सचिव पांडुरंग कुंभार यांचीही उपस्थिती होती.
प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ॲड. रविंद्र नागरगोजे यांचे काँग्रेसमध्ये स्वागत केले. तसेच पक्षाची विचारधारा आणि ध्येयधोरणे घेऊन काम करण्याचे आवाहन केले. नागरगोजे यांच्या पक्षप्रवेशामुळे धाराशिवच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून, धनंजय मुंडे यांच्याशी असलेले त्यांचे कौटुंबिक नातेही या निमित्ताने चर्चेत आले आहे. आगामी काळात नागरगोजे यांच्या प्रवेशाचा धाराशिव जिल्ह्यातील काँग्रेसच्या राजकारणावर काय परिणाम होतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
