तुळजापूर (प्रतिनिधी)- तीर्थक्षेत्र तुळजापूर शहरातील नळदुर्ग रोड परिसरात शुक्रवारी (दि. 2) पहाटे चारच्या सुमारास घराला अचानक भीषण आग लागून 62 वर्षीय व्यावसायिक चंद्रकांत दगडू माने यांचा आगीत दुर्दैवी मृत्यू झाला. आग लागल्यानंतर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले; मात्र अग्निशमन वाहनाच्या पाणी सोडण्याच्या यंत्रणेत बिघाड झाल्याने मदतकार्यात अडथळा निर्माण झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. या घटनेने तीर्थक्षेत्र तुळजापुरात एकच खळबळ उडाली आहे. सध्या तीर्थक्षेत्र तुळजापुरात शारदीय नवरात्र महोत्सवाची पूर्वतयारी जोरात सुरू आहे. चंद्रकांत माने हे शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दुकानातील मालाची तयारी करत असल्याचे समजते
चंद्रकांत माने हे मूळचे सिंदफळ येथील रहिवासी होते. गेल्या दहा ते बारा वर्षांपासून ते तुळजापुरात व्यवसाय करत होते. भवानी रोडवर त्यांचे प्रसाद व पूजेच्या साहित्याचे दुकान आहे. शुक्रवारी पहाटे त्यांच्या घराला अचानक आग लागली. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
कुटुंबीय बाहेर; वरच्या मजल्यावरून शिडीने उतरले
घटनेच्या वेळी माने यांची पत्नी, लहान मुलगा व सून हे गणगापूर येथे दर्शनासाठी गेले होते. मोठा मुलगा, सून व नातू घराच्या वरच्या मजल्यावर झोपले होते. आग लागल्याचे लक्षात येताच त्यांनी शिडीच्या सहाय्याने खाली उतरून आपला जीव वाचवला. मात्र चंद्रकांत माने हे आगीच्या विळख्यात अडकले आणि त्यांचा होरपळून मृत्यू झाला.
अग्निशमन वाहनाच्या यंत्रणेत बिघाड?
आग लागल्याची माहिती मिळताच नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. मात्र, स्थानिकांच्या म्हणण्यानुसार अग्निशमन वाहनाच्या पाणी सोडण्याच्या यंत्रणेत बिघाड झाला. वाहनाचा ‘पीटीओ' अचानक तुटल्याने पाणी सोडण्याची यंत्रणा बंद पडली आणि आग विझविण्याच्या कामात अडथळा निर्माण झाला, असा आरोप करण्यात आला आहे. अग्निशमन दलाचे वाहन अपेक्षित वेळी प्रभावीपणे काम करू शकले नसल्याचे समजताच परिसरातील नागरिकांनी स्वतः पुढाकार घेतला. घरातील बोअर सुरू करून तसेच मित्रपरिवार व नागरिकांनी बादल्यांच्या सहाय्याने पाणी टाकत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत आगीने मोठे नुकसान केले होते.

