धाराशिव (प्रतिनिधी)- धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सम्राट सेवाभावी सामाजिक संस्थेच्या वतीने धाराशिव येथील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस आगार परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करत पर्यावरण संवर्धनाचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
यावेळी आगार प्रमुख प्रवीण भोंडवे, स्थानक प्रमुख मुकेश कोमटवार, लिपिक अमर अंकुश, चालक उद्धव कसबे, वाहक नितीन कठारे, संस्थेचे अध्यक्ष संजय थोरात, भारतीय जनता पार्टीचे शहर उपाध्यक्ष स्वप्नील शिंगाडे, संस्थेचे उपाध्यक्ष बुद्धभूषण माने, सिद्धार्थ धावारे, सार्थक शिंगाडे यांच्यासह बस आगारातील कर्मचारी, संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आगार प्रमुख प्रवीण भोंडवे यांनी पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण आणि झाडांचे संगोपन आवश्यक असल्याचे सांगितले. संस्थापक अध्यक्ष संजय थोरात यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे महत्त्व विशद करत, “झाडे लावा, झाडे जगवा आणि पर्यावरणाचे रक्षण करा,” असे आवाहन केले.
सम्राट सेवाभावी सामाजिक संस्था आरोग्य शिबिरे, रक्तदान, विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत आणि विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत असून, भविष्यातही सामाजिक बांधिलकी जपण्याचा संस्थेचा मानस आहे. बस आगार प्रशासन व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याबद्दल संस्थेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले. कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
