धाराशिव (प्रतिनिधी)- “ अभिनय प्रशिक्षणाच्या व्यवहाराला सिद्धांताची आणि सैद्धांतिक अभ्यासाला व्यवहाराची जोड असणे आवश्यक आहे. अशा प्रकारच्या समन्वयातून अभिनयाचे शिक्षण आणि प्रशिक्षण प्रभावी ठरू शकते“ असे उद्गार प्रसिद्ध नाट्य शिक्षक - प्रशिक्षक, नाटककार आणि दिग्दर्शक तसेच लेखक आणि समीक्षक तसेच वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या प्रादर्शिक कला विभागाचे वरिष्ठ सहायक डॉ सतीश पावडे यांनी काढले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या धाराशिव उपकेंद्रातील नाट्यशास्त्र आणि लोककला विभागाच्यावतीने आयोजित “अभिनय कला“ संवाद कार्यक्रमात व्याख्याते म्हणून ते बोलत होते. डॉ. पावडे पुढे म्हणाले “ शक्ती, ऊर्जा आणि चैतन्य ही अभिनयाची प्रारंभिक गरज आहे. यावर अभिनयाचे कौशल्य अवलंबून असते. शिवाय अभिनयाचे शिक्षण घेण्यासाठी ही त्रिसूत्री कलावंताला मदत करते. सोबतच विद्यार्थ्यांनी भरताच्या नाट्यशास्त्रातील आंगिक, वाचिक, आहार्य, सात्विक आणि चित्राभिनयाचा सिद्धांत आणि व्यवहार समजून घेणेही अत्यावश्यक आहे.
डॉ. पावडे यांचे स्वागत आणि सत्कार केंद्राचे संचालक प्रा. डॉ. रमेश चौगुले यांनी केले. व्याख्यान आयोजित करण्यासाठी नाट्यशास्त्र व लोककला विभागाचे विभागप्रमुख डॉ महेश्वर कळलावे यांनी पाठिंबा दिला. प्रास्ताविक नाट्यदिग्दर्शक प्रा. कैलास पुपुलवाड यांनी तर आभार डॉ. उषा कांबळे यांनी मांडले. यावेळी डॉ. अमोल पाणबुडे लिखित आणि प्रा. कैलास पुपुलवाड दिग्दर्शित“ कृषागगाथा “ही एकांकिका विभागाच्या विद्यार्थ्यांनी सादर केली.
याप्रसंगी सचिन शिंदे, समाधान खंडागळे , अविनाश शिंदे, सुमेध चिलवंत, प्रकाश मुळे, सुमित ठनांबीर, साक्षी गायकवाड, प्राजक्ता रेणके, आकांक्षा सोळंके
आदी उपस्थित होते.
