धाराशिव (प्रतिनिधी)- आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे माणसाचे आयुर्मान वाढत आहे.मात्र,वाढत्या वयाबरोबर शरीर आणि मनाच्या आरोग्याची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. साठीनंतरच्या आयुष्याकडे नकारात्मकतेने न पाहता सकारात्मक दृष्टीने पाहिले पाहिजे. ऋतू बदलतात तसे जीवनाचे टप्पेही बदलत असतात.त्यामुळे साठीनंतरचा काळ आरोग्यदायी, आनंदी आणि प्रेरणादायी करण्यासाठी प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाने स्वतःच्या आरोग्याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे,असे आवाहन प्रमुख मार्गदर्शक डॉ.श्री.अनिकेत इनामदार यांनी केले.

आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त 1 ऑक्टोबर रोजी सामाजिक न्याय भवनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात डॉ.इनामदार बोलत होते.ज्येष्ठ नागरिक संघाचे अडसूळ महाराज, समाज कल्याणचे सहायक आयुक्त सचिन कवले,समाजकल्याण अधिकारी सनम लामखाने यांची प्रमुख उपस्थिती होती, अध्यक्षस्थानी डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त श्री.खुने अध्यक्षस्थानी होते.

डॉ.श्री.इनामदार म्हणाले, साठीनंतरच्या जीवनात काही वेळा नकारात्मकता वाढू शकते.ती बदलून आयुष्याकडे सकारात्मकतेने पाहण्याची आवश्यकता आहे.वृद्धापकाळात स्वतःकडे दुर्लक्ष न करता आरोग्याची नियमित काळजी घेतली पाहिजे.नियमित वैद्यकीय तपासणी केल्यास आजारांचे वेळीच निदान होऊन मोठ्या आजारांना प्रतिबंध करता येऊ शकतो.वाढत्या वयात आरोग्याच्या छोट्या तक्रारींकडेही दुर्लक्ष करू नये.वयोमानानुसार हाडे आणि स्नायू कमकुवत होऊ शकतात. त्यामुळे साधे-सोपे व्यायाम नियमित करून स्नायू बळकट ठेवणे आवश्यक आहे.वाढत्या वयानुसार दृष्टी,श्रवणशक्ती आणि स्मरणशक्तीशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. मोतीबिंदूसारख्या आजारावर योग्य वेळी उपचार करून घ्यावेत.कमी ऐकू येत असल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता आवश्यक वैद्यकीय सल्ला व उपचार घ्यावेत. स्मरणशक्ती कमी होणे तसेच अल्झायमरसारख्या आजारांबाबतही ज्येष्ठ नागरिक आणि त्यांच्या कुटुंबीयांनी जागरूक राहणे आवश्यक आहे. जीवनशैलीत योग्य बदल,नियमित व्यायाम आणि आरोग्यविषयक दक्षतेच्या माध्यमातून वृद्धापकाळातील अनेक आरोग्य समस्यांचा प्रभाव कमी करता येऊ शकतो,असेही त्यांनी सांगितले.

निरोगी वृद्धत्वासाठी योग, प्राणायाम आणि संतुलित आहार महत्त्वाचा असल्याचे सांगताना श्री. इनामदार यांनी रोज योग व प्राणायाम करण्याचा सल्ला दिला. भ्रामरी प्राणायाम आणि अनुलोम-विलोम यांचा नियमित सराव करावा.सकाळच्या कोवळ्या उन्हात सुमारे 15 मिनिटे फिरावे. स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देतानाच श्वसनाकडेही सजगपणे लक्ष दिल्यास आरोग्यात सकारात्मक सुधारणा होऊ शकते. आहारात सात्त्विकता वाढवून वाढत्या वयात शरीराला आवश्यक पोषक घटकांचा समावेश करावा. स्नायू कमकुवत होत असल्याने योग्य व फायबरयुक्त आहारालाही महत्त्व द्यावे,असे मार्गदर्शन त्यांनी केले.

अध्यक्षस्थानावरून बोलताना सामाजिक कार्यकर्ते श्री.खुने म्हणाले,आज माणसाची जीवनशैली मोठ्या प्रमाणात बदलली आहे.समाजाची आणि तंत्रज्ञानाची जेवढी प्रगती होत आहे,त्याचबरोबर काही बाबतीत अधोगतीही दिसून येत आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या जीवनातील आवश्यक नियम आणि शिस्त पाळली पाहिजे. एकमेकांशी प्रेमाने वागणे, परस्परांचा आदर करणे आणि माणुसकीची नाती जपणे हे आनंदी जीवनासाठी आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रमुख अतिथी अडसूळ महाराज म्हणाले,शासन निर्णयांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध सोयी- सुविधांची तरतूद करण्यात आली आहे.आई-वडील आणि घरातील ज्येष्ठांचा नेहमी सन्मान केला पाहिजे.चांगले जीवन जगण्यासाठी ज्येष्ठांचे आशीर्वाद महत्त्वाचे आहेत.प्रत्येक वर्षी ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र ग्रामसभा आयोजित केली पाहिजे.त्यामुळे त्यांच्या समस्या समोर येऊन त्यांचे निराकरण करण्यास मदत होईल. ज्येष्ठांचे जीवन सुखकर करण्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

पोलीस विभागाचे श्री.शिंदे यांनी डिजिटल साक्षरतेबाबत मार्गदर्शन केले.अनोळखी व्यक्तीकडून फोन करून वैयक्तिक माहिती,बँक खाते क्रमांक किंवा ओटीपीची मागणी केली गेल्यास कोणतीही माहिती देऊ नये.डिजिटल व्यवहार करताना ज्येष्ठ नागरिकांनी विशेष सावधगिरी बाळगावी आणि संशयास्पद कॉलला प्रतिसाद देताना सतर्क राहावे,असे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकातून सहाय्यक आयुक्त श्री.कवले यांनी समाजकल्याण विभागाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली.ज्येष्ठ नागरिकांसाठी शासनाच्या विविध योजना असून त्यांचा लाभ घेऊन त्यांनी आपले जीवन अधिक सुखकर करावे, असे आवाहन त्यांनी केले. आरोग्य विभागाचे वासुदेव वेदपाठक यांनी महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेची माहिती दिली.ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही योजना महत्त्वाची असून पात्र नागरिकांनी तिचा लाभ घ्यावा,असे त्यांनी सांगितले.

अनिल पाटील यांनी ‌‘ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या' या विषयावर मार्गदर्शन केले.कार्यक्रमात काही ज्येष्ठ नागरिकांनीही आपले अनुभव आणि विचार व्यक्त केले. यावेळी ॲड.विनय देशमुख व अन्य ज्येष्ठ नागरिकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि समाजसुधारकांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली.ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य तपासणीचीही विशेष व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमाचे संचालन प्रशांत शिंदे यांनी केले,तर समाजकल्याण अधिकारी सनम लामखाने यांनी आभार मानले.कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिकांसह विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

 
Top