धाराशिव (प्रतिनिधी)- यावर्षीच्या गळीत हंगामात ऊसाला पहिली उचल 5000 रूपये द्यावी यासह साखर, इथेनॉल दर व शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज (दि.1) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. तब्बल अर्धा तास चाललेल्या या आंदोलनानंतर जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी आंदोलकांच्या मागण्या जाणून घेऊन त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याबाबत आश्वासित केले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष रवींद्र इंगळे यांच्या नेतृत्त्वाखाली हातात ऊस घेऊन मोठ्या संख्येने शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. शेतकऱ्यांच्या मागण्याबाबत यावेळी घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले की, धाराशिव जिल्ह्यातील सहकारी, खाजगी, गुळ पावडर व खांडसरी कारखाने शेतकऱ्यांचा भाव ठरवल्याशिवाय व पहिली उचल 5000/- दिल्याशिवाय कारखाने सुरु करण्यास परवानगी देण्यात येऊ नये, तसेच कारखान्यातील उसाच्या वजन काट्यावर अविश्वासही निवेदनात अविश्वास व्यक्त करण्यात आला आहे. ऊस (नियंत्रण) आदेश 1966 आणि वैधमापन शास्त्र अधिनियम 2009 नुसार शेतकऱ्याला स्वतंत्र व अधिकृत काट्यावर करून घेण्याचा अधिकार आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेताच्या बांधावर, बाजार समितीच्या काट्यावर किंवा शासकीय अधिकृत वजन काट्यावर ऊसाचे वजन करायचे असेल त्याला अडवू नये, सर्व कारखान्यांना आदेश द्यावा.
तसेच साखरेचा हमीभाव 5 हजार रूपये प्रति क्विंटल करावा, उसापासून बनणाऱ्या इथेनॉलचा भाव 65/- वरून 85 रुपये प्रतिलिटर करावा, बाढीव नफ्यातील 70% रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्याला देणे बंधनकारक करावे, जोपर्यंत इथेनॉल दरवाढ होत नाही, तोपर्यंत इथेनॉलसाठी ऊस गाळप करू नये असा आदेश काढावा.
त्यामुळे धाराशिव जिह्यातील ऊस उत्पादक शेतकत्यांना पहिली उच्चल 5 हजार अरुपये दिल्याशिवाय जिल्ह्यातील एकही सहकारी, खाजगी, गुळ पावडर व खांडसरी कारखाने यावर्षी चालू दिले जाणार नाहीत. तसेच भाव ठरल्याशिवाय कारखाना सुरु करण्यास बंदी घालावी जोपर्यंत शेतकरी संघटना व कारखानदार यांच्यात बैठक होऊन ऊसाचा अंतिम भाव ठरत नाही, तोपर्यंत कोणत्याही कारखान्याला गाळप परवाना व बॉयलर अग्निप्रदीपनाची परवानगी देऊ नये, यावर्षी उत्पादन खर्च दुप्पट झाला आहे त्यामुळे पहिली उचल प्रतिटन 5 हजार रुपये रोख स्वरूपात दिल्याशिवाय कारखाना चालू करू नये असा लेखी आदेश सर्व कारखान्यांना द्यावा, आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई करावी यासह विविध मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष रवींद्र इंगळे, स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष तानाजी पाटील, जिल्हा उपाध्यक्ष धनाजी पेदे, संपर्कप्रमुख शहाजी सोमासे, राजभाऊ हाके, दुर्वास भोजने, संजय भोसले, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष विष्णू काळे यांच्यासह रवि गरड, महादेव टेकाळे, कमलाकर पवार, दिलीप चव्हाण, उमेश शेळके, रामकृष्ण पाटील, मनोज सरवदे, नीलेश सरवदे, शंकर टेकाळे, बाळासाहेब टेकाळे, प्रकाश सरवदे, महेश सरवदे, माणिक घाटुळे, धोंडिबा साळुंके, उद्धव शेळके, शाम पाटील, श्रीकांत साळुंके, संजय शेळके, चंद्रकांत पाटील, संदीप जाधव, सतीश माने, अजित शेळके, ज्ञानेश्वर बंडगर, विकास मस्के, विष्णू पाडे, साहेबराव राऊत, प्रवीण कुलकर्णी, अण्णा नरवडे, विश्वंभर पाडे, बबन राऊत, संतोष कानाडे, नारायण जाधव, उत्रेश्वर कानाडे, सिद्धेश्वर कानाडे, रवि भंडारे, नीलेश मुंडे यांच्यासह जिल्ह्यातील विविध गावांतील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
