भूम (प्रतिनिधी)-  भूम पोलीस ठाण्यात श्रीगणेश कानगुडे यांची पुन्हा नियुक्ती करण्यात येऊ नये, अशी ठाम मागणी भूम शहरातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. यासंदर्भात छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांना निवेदन देण्यात आले असून, मागणीचा गांभीर्याने विचार करून योग्य निर्णय घेण्याची विनंती करण्यात आली आहे.

निवेदनानुसार, पोलीस निरीक्षक श्रीगणेश कानगुडे यांच्या बदलीसाठी 28 जुलै रोजी शहरातील नागरिकांनी निवेदन दिले होते. त्यानंतर त्यांच्या जागी परिविक्षाधीन अधिकारी अमोल मोहिते यांची नियुक्ती करण्यात आली. मोहिते यांनी भूम पोलीस ठाण्याचा कार्यभार सांभाळल्यानंतर शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच शांतता आणि सामाजिक सलोखा निर्माण करण्यासाठी प्रयत्न केल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, अमोल मोहिते यांच्या तीन महिन्यांच्या कार्यकाळाची पूर्तता होत असताना त्यांच्या जागी पुन्हा श्रीगणेश कानगुडे यांची नियुक्ती करण्यात येऊ नये, अशी मागणी पुढे आली आहे. या मागणीचा सकारात्मक विचार न झाल्यास भूम तालुका बेमुदत बंद ठेवून आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

या निवेदनावर माजी नगराध्यक्ष विजयासिंह राजे थोरात, भाजपचे बाळासाहेब धीरसागर, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष दिलीप गाढवे, शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप शाळू, नगरसेवक चंद्रमणी गायकवाड, अनिल शेंडगे, भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष सुपेकर, गणेश शाळू, विनोद नाईकवाडी, भास्कर वारे, उमेश माळी, हरिश्चंद्र पवार आणि बाबासाहेब वीर यांच्यासह विविध राजकीय, व्यापारी व सामाजिक क्षेत्रांतील पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. या मागणीवर पोलीस प्रशासन काय निर्णय घेणार आणि भूममधील नागरिकांच्या मागणीला कसा प्रतिसाद देणार, याकडे आता शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.


 
Top