तुळजापूर (प्रतिनिधी)-  महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवात आज, शुक्रवार, दिनांक 16 ऑक्टोबर रोजी सहाव्या माळेनिमित्त श्री तुळजाभवानी देवीची मुरली अलंकार महापूजा मांडण्यात आली.

शारदीय नवरात्र महोत्सवाच्या सहाव्या माळेच्या दिवशी श्री तुळजाभवानी देवीची मुरली अलंकार महापूजा मांडण्यात येते. धार्मिक आख्यायिकेनुसार, महिषासुराशी युद्ध करताना देवीच्या विविध रूपांचे दर्शन घडते. मुरलीधर रूपातील देवीने मुरलीवादनाच्या माध्यमातून स्वर्गातील भयभीत देव-देवता आणि ऋषीमुनी यांना धीर दिला. तसेच त्यांच्या मनात आनंद व उत्साह निर्माण केला, अशी मान्यता आहे. या अलंकार पूजेतून देवीच्या या दिव्य स्वरूपाचे दर्शन भाविकांना घडते.

दरम्यान,  गुरुवार, दिनांक 15 ऑक्टोबर रोजी श्री तुळजाभवानी देवीची छबिना मिरवणूक राजहंस वाहनावरून काढण्यात आली. यावेळी तहसीलदार तथा विश्वस्त अरविंद बोळंगे, तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने, सहायक व्यवस्थापक (सामान्य) जयसिंग पाटील, सहायक व्यवस्थापक (प्रशासन) नागेश शितोळे, सहायक व्यवस्थापक (धार्मिक) अनुप ढमाले, महंत तुकोजीबुवा, महंत वाकोजीबुवा, पुजारी, सेवेकरी व भाविक उपस्थित होते.


 
Top