धाराशिव (प्रतिनिधी)- औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी येत्या 23 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक आणि विहित वेळेत पार पाडण्यासाठी विविध कक्षांसाठी नियुक्त करण्यात आलेल्या सर्व नोडल अधिकाऱ्यांनी भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आपापल्या जबाबदाऱ्या अत्यंत दक्षतेने आणि वेळेत पार पाडाव्यात,असे निर्देश जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिले.
भारत निवडणूक आयोगाने या निवडणुकीचा कार्यक्रम 22 सप्टेंबर रोजी घोषित केला असून,त्या दिवसापासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून प्रत्येक टप्प्याचे सूक्ष्म नियोजन करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आज, 30 सप्टेंबर रोजी पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पूर्वतयारीसंदर्भात सर्व नोडल अधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली.या बैठकीत जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी पुजार बोलत होते.यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे,निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी पुजार म्हणाले, पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगाने वेळोवेळी देण्यात येणारे प्रशिक्षण संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काळजीपूर्वक घ्यावे. मतदान करताना मत अवैध ठरणार नाही, याबाबत मतदारांमध्ये आवश्यक जनजागृती करावी. असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले..
