धाराशिव (प्रतिनिधी)- वर्षानुवर्षे न्यायालयात सुरू असलेला वाद,त्यासाठी खर्च होणारा वेळ आणि पैसा,तसेच वादामुळे नातेसंबंधांमध्ये निर्माण होणारा दुरावा टाळण्यासाठी आता सामंजस्याचा मार्ग अधिक प्रभावीपणे खुला होणार आहे. न्यायालयात प्रलंबित असलेले वाद मध्यस्थीच्या माध्यमातून परस्पर संमतीने मिटविण्यासाठी जिल्ह्यात ‘मेडिएशन फॉर नेशन 3.0' या विशेष मध्यस्थी मोहिमेला सुरुवात करण्यात येत आहे.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण,नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण,मुंबई यांच्या निर्देशानुसार धाराशिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये ही मोहीम राबविण्यात येणार आहे. 1 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर 2026 या तीन महिन्यांच्या कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात ही मोहीम प्रभावीपणे राबविली जाणार आहे. ‘मेडिएशन फॉर नेशन 3.0' मोहिमेचा मुख्य उद्देश वादमुक्त समाजनिर्मिती हा आहे.दिवाणी, कौटुंबिक,व्यापारी तसेच तडजोडयोग्य फौजदारी गुन्ह्यांमधील खटले न्यायालयाबाहेर मध्यस्थीच्या माध्यमातून सोडविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.वादावर तोडगा काढतानाच संबंधित पक्षकारांमधील नातेसंबंध जपण्यावरही विशेष भर दिला जाणार आहे.
न्यायालयातील प्रदीर्घ प्रक्रियेमुळे पक्षकारांचा मोठ्या प्रमाणावर वेळ आणि पैसा खर्च होतो.मध्यस्थी प्रक्रियेमध्ये मात्र एकाच ठिकाणी दोन्ही पक्षांच्या परस्पर संमतीने वादावर निर्णय घेण्याची संधी उपलब्ध होते.त्यामुळे पक्षकारांच्या वेळेसह पैशांचीही बचत होऊ शकते.
या मोहिमेचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे कायदेशीर गोपनीयता.मध्यस्थी केंद्रामध्ये वादाच्या अनुषंगाने होणारी सर्व चर्चा पूर्णपणे गोपनीय ठेवली जाते.त्यामुळे पक्षकारांना आपली बाजू मोकळेपणाने मांडून परस्पर सामंजस्यातून वाद सोडविण्याची संधी मिळते. पक्षकारांनी आपले वाद न्यायालयात प्रदीर्घ काळ न ताणता मध्यस्थांच्या मदतीने परस्पर संमतीने व जलद गतीने मिटवून घ्यावेत.तसेच 1 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर 2026 या तीन महिन्यांच्या विशेष मोहिमेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अभिश्री देव आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव भाग्यश्री पाटील यांनी केले आहे.