भूम (प्रतिनिधी)- भारताचे माजी राष्ट्रपती, थोर शास्त्रज्ञ आणि ‘मिसाईल मॅन' म्हणून ओळखले जाणारे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त रविंद्र हायस्कूल, भूम येथे वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, ज्ञानाची कक्षा रुंदावावी आणि वाचनसंस्कृतीला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने शाळेत विविध वाचनविषयक उपक्रम राबविण्यात आले.
डॉ. अब्दुल कलाम यांची जयंती हा विद्यार्थ्यांसाठी ज्ञान, विज्ञान आणि प्रेरणेचा संदेश देणारा दिवस म्हणून साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारांचा आदर्श समोर ठेवून पुस्तकांचे महत्त्व जाणून घेतले. शाळेतील ग्रंथालयातून विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीची पुस्तके घेऊन त्यांचे मनापासून वाचन केले. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तके वाचली नाहीत, तर डॉ. कलाम यांच्या जयंतीचे औचित्य साधून वाचलेल्या पुस्तकांचा अभिप्राय इतर विद्यार्थ्यांसमोर मांडला. पुस्तकातून मिळालेले ज्ञान, नवीन विचार आणि प्रेरणादायी अनुभव त्यांनी आपल्या शब्दांत व्यक्त केले. या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या वाचनकौशल्याला, विचारशक्तीला आणि आत्मविश्वासाने व्यक्त होण्याच्या क्षमतेला प्रोत्साहन मिळाले. हा उपक्रम यशस्वीरीत्या राबवण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका शर्मिला पाटील, पर्यवेक्षक मिलिंद लगाडे, सर्व शिक्षक, शिक्षिका यांनी परिश्रम घेतले.
