धाराशिव (प्रतिनिधी)- साहित्याची आवड जोपासत, महिलांच्या लेखणीला व्यासपीठ उपलब्ध करून देत आणि साहित्यिक चळवळीला सातत्याने बळ देत धाराशिव येथील अक्षरवेल महिला साहित्य मंडळ गेल्या वीस वर्षांपासून साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहे. वर्षभर विविध साहित्यिक,सामाजिक उपक्रमांचे आयोजन करणाऱ्या या मंडळाच्या वतीने दरवर्षी दिवाळीनिमित्त दिवाळी अंकाचे प्रकाशन केले जाते. यंदाच्या दिवाळी 2026 साठी प्रकाशित होणारा ‌‘अंकुर' हा दिवाळी अंक संत साहित्यावर आधारित असून, त्यातून संतविचारांचा समृद्ध वारसा वाचकांसमोर उलगडणार आहे.

या दिवाळी अंकामध्ये नामांकित लेखिकांसह स्थानिक लेखिकांनीही आपल्या लेखणीद्वारे योगदान दिले आहे. संत साहित्याचा विचार, त्यातील जीवनमूल्ये, भक्तीपरंपरा आणि समाजप्रबोधनाचा संदेश वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा सुंदर प्रयत्न या अंकातून करण्यात आला आहे.  नव्या विचारांचे अंकुर फुलविणारा आणि संतविचारांचा सुगंध दरवळविणारा हा अंक साहित्यप्रेमींसाठी निश्चितच पर्वणी ठरणार आहे. या ‌‘अंकुर' दिवाळी अंकाचे प्रकाशन रविवार, दिनांक 18 ऑक्टोबर 2026 रोजी धाराशिव येथील मुक्तांगण शाळेत सुप्रसिद्ध लेखिका डॉ. नयन राजमाने यांच्या हस्ते दुपारी दोन वाजता  होणार आहे.

दिवाळी हा प्रकाशाचा, आनंदाचा आणि मांगल्याचा सण. शब्दांच्या प्रकाशाने मन समृद्ध करणाऱ्या साहित्याच्या या सोहळ्यात सहभागी होत साहित्यप्रेमींना दिवाळीपूर्वीच साहित्यिक दिवाळीचा आनंद अनुभवता यावा, या उद्देशाने मंडळाच्या वतीने सर्व साहित्यप्रेमींना प्रकाशन सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अक्षरवेल महिला साहित्य मंडळाच्या मार्गदर्शक कमलताई नलावडे, विद्यमान अध्यक्षा डॉ. सुलभाताई देशमुख आणि संस्थापक अध्यक्ष डॉ. रेखा ढगे यांनी सर्व साहित्यप्रेमी, वाचक आणि साहित्य क्षेत्रातील मान्यवरांना या प्रकाशन सोहळ्यास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविण्याचे आवाहन केले आहे. शब्दांचा सुगंध, संतविचारांचा प्रकाश आणि लेखणीचा सृजनोत्सव अनुभवण्यासाठी ‌‘अंकुर'च्या प्रकाशन सोहळ्यात सहभागी व्हा आणि दिवाळीपूर्वीच साहित्याची दिवाळी साजरी करा.


 
Top