धाराशिव (प्रतिनिधी)- शेतकऱ्यांना अनुदानित खतांची खरेदी अधिक पारदर्शक, सुलभ आणि सुव्यवस्थित पद्धतीने करता यावी,यासाठी जिल्ह्यात रब्बी हंगाम 2026 मध्ये एफएफएस डिजिटल प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे.या प्रणालीमुळे शेतकऱ्यांना आता घरबसल्या अनुदानित खतांची ऑनलाइन बुकिंग करता येणार असून,खतासाठी होणारी अनावश्यक गर्दी आणि प्रतीक्षाही टाळता येणार आहे.
जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी या सुविधेचा लाभ घेण्यासाठी आपल्या मोबाईलमधील गुगल पे स्टोर्स वरून एफएफएस ॲप डाउनलोड करावे.ॲपमध्ये नोंदणी करताना आपल्या जमिनीची आणि पिकाची अचूक माहिती भरावी. त्यानंतर आवश्यक असलेल्या अनुदानित खताची ऑनलाइन बुकिंग करावी.खताची ऑनलाइन बुकिंग पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष खत खरेदीच्या वेळी शेतकऱ्यांनी ॲपमधील कोड कृषी सेवा केंद्रातील अधिकृत खत विक्रेत्यास दाखवावा.त्यानंतर संबंधित खत विक्रीची नोंद डिजिटल पद्धतीने करण्यात येईल.
या डिजिटल प्रणालीमुळे शेतकऱ्यांना खतासाठी विक्री केंद्रांवर अनावश्यक गर्दी करण्याची किंवा दीर्घकाळ प्रतीक्षा करण्याची गरज राहणार नाही. शेतकऱ्यांना घरबसल्या आवश्यक खताची बुकिंग करता येणार आहे. विशेष म्हणजे,खताचे ऑनलाइन बुकिंग केल्यापासून पुढील दोन दिवसांच्या कालावधीत संबंधित शेतकरी किंवा त्याचा प्रतिनिधी खत विक्री केंद्रावर जाऊन बुकिंग केलेले खत खरेदी करू शकणार आहे.