धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी जलसंधारण, भूजल पुनर्भरण, चारा व्यवस्थापन, ग्रामीण पायाभूत सुविधांची निर्मिती आणि ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या कामांचे प्रभावी नियोजन व अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद धाराशिवच्या वतीने विकसित भारत रोजगार व आजीविका हमी ग्रामीण (VB-G RAM-G) योजनेच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यशाळेत दुष्काळ व पाणीटंचाई निवारणासाठी ग्रामस्तरावर करावयाच्या उपाययोजना, ग्रामीण रोजगारनिर्मिती, जलसंधारण आणि विकासकामांच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर देण्यात आला.
अध्यक्षीय मार्गदर्शन करताना अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांनी धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी, प्रशासन, ग्रामपंचायती, गटविकास अधिकारी आणि ग्रामस्तरीय यंत्रणांनी एकत्रितपणे व समन्वयाने काम करण्याची आवश्यकता अधोरेखित केली. अशा आव्हानात्मक परिस्थितीत सर्वांनी एकजुटीने प्रयत्न केल्यास दुष्काळ व पाणीटंचाईच्या समस्यांवर प्रभावी उपाययोजना करता येतील. त्यामुळे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने परस्पर सहकार्याने ग्रामीण भागातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यशाळेच्या प्रारंभी उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम भालके यांनी प्रास्ताविक केले. कार्यशाळेदरम्यान लेखक तथा राज्य प्रशिक्षक रवींद्र इंगोले लिखित ‘विकसित भारताची ग्रामक्रांती' या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे यांनी दुष्काळ व टंचाई निवारणासाठी ग्रामपंचायत स्तरावर प्रभावी नियोजन, विभागीय समन्वय आणि विकासकामांच्या अंमलबजावणीतील गती यांचे महत्त्व अधोरेखित केले. या जिल्हास्तरीय कार्यशाळेस समाज कल्याण समितीचे सभापती विश्वास हनुमंत कोकणे, अर्थ व बांधकाम समितीचे सभापती सिद्धेश्वर बाजीराव कोरे, पंचायत समिती कळंबच्या सभापती राजश्री धनंजय वरपे, पंचायत समिती धाराशिवच्या सभापती गोकर्णा गोपाळ कदम, आदी उपस्थित होते. कार्यशाळेचे सूत्रसंचालन उपशिक्षणाधिकारी (प्रा.) दत्तप्रसाद जंगम यांनी केले.
