धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी देवीचा शारदीय नवरात्र महोत्सव नुकताच उत्साहात संपन्न झाला. या महोत्सवाच्या कालावधीत तुळजापूरात श्री तुळजाभवानी देवींच्या दर्शनासाठी लाखो भाविकांनी हजेरी लावली. भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेऊन श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या सुरक्षा विभागामार्फत सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. या काळात हरवलेल्या भाविकांचा शोध घेऊन त्यांना नातेवाइकांच्या स्वाधीन करणे, गरजू भाविकांना वैद्यकीय मदत उपलब्ध करून देणे, हरवलेल्या मौल्यवान वस्तू परत करणे, चोरीच्या घटनांचा तपास करण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजची मदत घेणे तसेच दर्शन रांगांचे नियोजन करणे, अशा विविध जबाबदाऱ्या सुरक्षा विभागाने पार पाडल्या.
हरवलेल्या 738 भाविकांची नातेवाइकांशी घडवून आणली भेट
शारदीय नवरात्र महोत्सवाच्या कालावधीत दर्शन मंडप येथील सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून हरवलेल्या 138 भाविकांचा, तर पीसीआर नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून 600 भाविकांचा शोध घेण्यात आला. त्यानंतर संबंधित भाविकांची ओळख पटवून त्यांना त्यांच्या नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आले. सुरक्षा विभागाने केलेल्या कार्यवाहीमुळे गर्दीच्या काळात हरवलेल्या एकूण 738 भाविकांना त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचविण्यात यश आले.
52 भाविकांना वैद्यकीय मदत
शारदीय नवरात्र महोत्सवादरम्यान प्रकृती अस्वास्थ्यामुळे किंवा अन्य कारणांमुळे वैद्यकीय मदतीची आवश्यकता भासलेल्या 52 भाविकांना सुरक्षा विभागाच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाने तातडीने मदत केली. संबंधित भाविकांना स्ट्रेचरच्या साहाय्याने रुग्णवाहिकेपर्यंत पोहोचविण्यात आले. त्यानंतर त्यांना पुढील उपचारांसाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
31 हरवलेल्या मौल्यवान वस्तू संबंधित भाविकांना परत
दर्शन मंडप येथील सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून भाविकांच्या हरवलेल्या बॅगा, पर्स, मोबाईल, रोख रक्कम तसेच सोने-चांदीच्या वस्तू अशा एकूण 31 मौल्यवान वस्तूंची खात्री करून त्या संबंधित भाविकांपर्यंत पोहोचविण्यात आल्या.
सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने चोरीस गेलेला मोबाईल हस्तगत
दि. 10 ऑक्टोबर 2026 रोजी दर्शन मंडपाच्या बाहेरील बाजूच्या पायऱ्यांवर एका महिला भाविकाचा मोबाईल चोरीस गेल्याची तक्रार दर्शन मंडप येथील सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाला प्राप्त झाली. त्यानंतर नियंत्रण कक्षातील कर्मचाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून मोबाईल चोरी करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला. संबंधित व्यक्तीचा शोध घेऊन चोरीस गेलेला मोबाईल त्याच्याकडून हस्तगत करण्यात आला आणि तो महिला भाविकेला परत करण्यात आला.
CPR द्वारे भाविकावर प्रथमोपचार
दि. 25 ऑक्टोबर 2026 रोजी घाटशीळ मंदिर परिसरात एक भाविक अचानक बेशुद्ध पडला. यावेळी महाराष्ट्र सुरक्षा बलाचे सुरक्षा रक्षक दीपक पोतदार यांनी प्रसंगावधान राखून संबंधित भाविकाला तातडीने CPR (Cardiopulmonary Resuscitation) दिला. त्यामुळे भाविक शुद्धीवर आला. त्यानंतर SISPL च्या सुरक्षा रक्षकांनी स्ट्रेचरच्या साहाय्याने त्याला पुढील उपचारांसाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. सुरक्षा रक्षकांनी केलेल्या प्राथमिक उपचारांमुळे संबंधित भाविकाला तातडीने वैद्यकीय मदत मिळाली.