धाराशिव (प्रतिनिधी)- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी नूतनीकरण अर्ज सादर करण्याची मुदत आता 15 ऑक्टोबर 2026 पर्यंत वाढविण्यात आली आहे. ऑनलाइन अर्ज करताना विद्यार्थ्यांना येणाऱ्या तांत्रिक अडचणी तसेच काही विद्यार्थ्यांचे निकाल अद्याप जाहीर न झाल्याने ही मुदतवाढ देण्यात आली आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी पात्र असलेल्या तसेच वसतिगृह प्रवेशासाठी रीतसर अर्ज करूनही शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविण्यात येते.या योजनेअंतर्गत इयत्ता अकरावी,बारावी तसेच व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेता यावे,यासाठी भोजन भत्ता,निवास भत्ता तसेच इतर शैक्षणिक सुविधा स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी आर्थिक सहाय्य केले जाते.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णयानुसार डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना तालुकास्तरावर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठीही लागू करण्यात आली आहे.
आता 15 ऑक्टोबरपर्यंत करता येणार अर्ज
डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सन 2026-27 साठी https://hmasnew.mahait.org या पोर्टलवर नूतनीकरण अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत यापूर्वी 30 सप्टेंबर 2026 होती. मात्र,ऑनलाइन प्रणालीवर अर्ज करताना विद्यार्थ्यांना येणाऱ्या तांत्रिक अडचणी,विद्यार्थ्यांचे निकाल न लागणे आदी बाबींचा विचार करून नूतनीकरण अर्ज सादर करण्यासाठी आता 15 ऑक्टोबर 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. जिल्ह्यातील धाराशिव नगरपालिका हद्दीतील तसेच सर्व तालुका नगरपालिका/नगरपरिषद हद्दीतील महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या आणि स्वाधार योजनेसाठी पात्र असलेल्या ज्या नूतनीकरण विद्यार्थ्यांनी अद्याप अर्ज सादर केलेला नाही,त्यांनी या वाढीव मुदतीचा लाभ घ्यावा. त्याचप्रमाणे,ज्या तालुक्यांमध्ये शासकीय वसतिगृह उपलब्ध नाही, अशा तालुक्यांतील नगरपालिका/नगरपरिषद हद्दीतील महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी थेट स्वाधार योजनेसाठी 15 ऑक्टोबर 2026 पूर्वी https://hmasnew.mahait.org. या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावा.
ऑनलाइन अर्जानंतर हार्डकॉपी जमा करणे आवश्यक
विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज केल्यानंतर त्याची हार्डकॉपी म्हणजेच ऑनलाइन अर्जाची प्रत आणि आवश्यक कागदपत्रे समाज कल्याण कार्यालय,धाराशिव येथे जमा करावीत. स्वाधार योजनेसाठी पात्र असलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी 15 ऑक्टोबर 2026 पूर्वी अर्ज प्रक्रिया पूर्ण करून योजनेचा जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा,असे आवाहन सचिन कवले,सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण,धाराशिव यांनी केले आहे.