धाराशिव (प्रतिनिधी)- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 157 वी जयंती व भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची 122 वी जयंती जिल्हा काँग्रेस भवन, धाराशिव येथे उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
महात्मा गांधी यांच्या 157 व्या जयंतीनिमित्त धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटी व सेवा दलाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी गांधीजींच्या जीवनकार्यावर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. बहुपर्यायी स्वरूपाच्या या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध शाळांमधील तब्बल 300 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. गांधीजींचे जीवन, विचार, स्वातंत्र्यलढ्यातील योगदान आणि सत्य-अहिंसेच्या विचारांवर आधारित प्रश्न या प्रश्नमंजुषेत विचारण्यात आले.
या स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकानुसार रोख पारितोषिक, ट्रॉफी, सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र तसेच महात्मा गांधी यांच्या जीवनावर आधारित पुस्तके देऊन गौरविण्यात आले. प्रथम क्रमांक दीक्षा वीरेश बिडवे, प्रतीक्षा वीरेश बिडवे व निशिगंधा नवनाथ गायकवाड, द्वितीय क्रमांक प्रमोद समाधान चोरघडे, हर्षद धनाजी साळुंखे व शुभम बालाजी जगताप, तर तृतीय क्रमांक हृषिका सतीश रेणके व गपाट पृथ्वीराज रावसाहेब यांनी मिळविला. तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
या प्रश्नमंजुषा स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा सेवा दलाने विशेष परिश्रम घेतले. सेवा दलाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा या उपक्रमात मोठा व उत्स्फूर्त सहभाग राहिला. विद्यार्थ्यांसोबत त्यांचे शिक्षक व पालकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. गांधीजींच्या विचारांची आणि स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासाची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.
या कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष उमेश राजे निंबाळकर, विश्वास शिंदे, राजेंद्र शेरखाने, धनंजय राऊत, मिलिंद गोवर्धन, शिवाजी गायकवाड, विलास शाळू, जावेद काजी, अमर तागडे, जयसिंग पवार, संजय गजधने, बालाजी राठोड, हरिदास शिंदे, अभिमान पेठे, अशोक पेठे, श्यामसुंदर तोरकडे,मोईज सय्यद, पोपट शिंदे, तानाजी जाधव, मौलाना शौकत, शिवानंद तोडकर, बाळासाहेब बनसोडे, गणपत कांबळे, बसवराज पाटील, समीर साळवी इस्माईल मुल्ला यांच्यासह काँग्रेस व सेवा दलाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, सेवा दलाचे सदस्य, शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे गांधी-शास्त्री जयंतीचा कार्यक्रम व प्रश्नमंजुषा स्पर्धा यशस्वीरीत्या संपन्न झाला.
