वाशी (प्रतिनिधी)- कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी येथे आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन, राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून महाविद्यालय परिसर स्वच्छता अभियान व विशेष कार्यक्रमाचे सार्वजनिक उत्सव समिती, राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना व आजीवन अध्ययन व विस्तार विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले.

 यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. रामेश्वर कोठावळे, संयोजक प्रा.डॉ. आनंद करडे, प्रा,शामसुंदर डोके व राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.नेताजी देसाई उपस्थित होते.  यावेळी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी कु.स्नेहल जाधव,कु गायत्री गायकवाड, कल्पकता महामुनी व कु विवेकता महामुनी यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जीवन कार्याविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामेश्वर कोठावळे याप्रसंगी म्हणाले की अहिंसा व प्रेमाने जग जिंकता येते हा विचार महात्मा गांधींनी दिला. जीवनामध्ये अहिंसा सत्य व शांती महत्त्वाची आहे तसेच थोरा मोठ्यांच्या विचारांचे आचरण केले पाहिजे असे ते म्हणाले. माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री हे शौर्य व साधेपणाचे प्रतीक असून आपले विचार समाज उपयोगी असले पाहिजेत तसेच आपण स्वयं स्वच्छता, सार्वजनिक स्वच्छता तसेच सामाजिक स्वच्छतेकडे लक्ष दिले पाहिजे असे ते म्हणाले. बाह्य स्वच्छतेबरोबरच अंतर्मनाची स्वच्छता महत्त्वाची आहे असे प्रतिपादन त्यांनी केले. प्रतिमापूजन व व्याख्यानाच्या कार्यक्रमानंतर महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी यांनी महाविद्यालय परिसरामध्ये स्वच्छता केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ.आनंद करडे यांनी केले,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.दैवशाला रसाळ यांनी तर प्रा.डॉ.पार्थराज क्षीरसागर यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.कृष्णा थोरात,प्रा.डॉ.अशोक अलमुनवार यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी व प्राध्यापक वृंद शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

 
Top