भूम (प्रतिनिधी)- तालुक्यात यंदा दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने खरीप पिकांसह फळबागांवरही मोठे संकट ओढवले आहे. पाणीटंचाई, पावसाचा खंड आणि वाढता उत्पादन खर्च अशा प्रतिकूल परिस्थितीतही भूम परिसरातील शेतकरी भाऊसाहेब माळी यांनी आपल्या केळी पिकातून उल्लेखनीय उत्पादन घेतले आहे. त्यांच्या शेतातील सुमारे 30 टन केळी दुबई येथे निर्यात होणार असून, भूमच्या शेतमालाने थेट आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रवेश केला आहे.
भाऊसाहेब माळी यांनी आपल्या शेतात -9 या सुधारित वाणाच्या सुमारे 1 हजार 700 रोपांची लागवड केली होती. केळी पिकासाठी आवश्यक पाणी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी प्रतिकूल परिस्थितीतही पिकाची काळजी घेतली. पावसाचे प्रमाण कमी असतानाही योग्य नियोजन, खत व्यवस्थापन, कीड व रोग नियंत्रण तसेच पिकाची नियमित निगा राखल्यामुळे केळीचे चांगले उत्पादन मिळाले.
सध्या माळी यांच्या शेतातील सुमारे 30 टन केळीची 17 रुपये प्रतिकिलो दराने खरेदी करण्यात आली आहे. या केळीची प्रतवारी व आवश्यक प्रक्रिया करून ती दुबई येथील बाजारपेठेत पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर उत्पादित झालेला शेतमाल थेट आखाती देशातील ग्राहकांपर्यंत पोहोचणार आहे. केळीची खरेदी व निर्यात ट्रायडेंट ॲग्रोकॉम एक्स्पोर्ट या कंपनीच्या माध्यमातून करण्यात येत आहे. आखाती देशांमध्ये केळी निर्यात करणाऱ्या कंपन्यांमध्ये या कंपनीचे काम सुरू आहे. कंपनीचे जनरल मॅनेजर अतुल थिटे, मॅनेजर सोमनाथ फरतडे, तसेच सहाय्यक मॅनेजर गणेश लोकरे, गणेश मस्के, सूर्यकांत साबळे, अमित घाडगे व अमर लांडे यांनी केळीच्या खरेदी व निर्यात प्रक्रियेत सहभाग घेतला.
दुष्काळामुळे शेतकऱ्यांसमोर पिके वाचविण्याचे मोठे आव्हान असताना माळी यांनी केळीचे दर्जेदार उत्पादन घेऊन ते निर्यातीसाठी पात्र ठरविले आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्येही निर्यातक्षम शेतीमाल उत्पादनाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. स्थानिक बाजारपेठेबरोबरच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा पर्याय उपलब्ध झाल्यास शेतकऱ्यांना आपल्या उत्पादनाला व्यापक बाजारपेठ मिळू शकते, हे या निर्यातीच्या माध्यमातून अधोरेखित झाले आहे. दुष्काळी परिस्थितीतही शेतीत सातत्य ठेवून दर्जेदार उत्पादन घेणाऱ्या भाऊसाहेब माळी यांच्या प्रयत्नांचे परिसरातून कौतुक होत आहे. भूम तालुक्यातील शेतमाल भविष्यातही अशाच प्रकारे परदेशातील बाजारपेठेत पोहोचावा, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.