धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव शहरातील ठाकरे नगर नवरात्र महोत्सवाच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार, दि. 26 ऑक्टोबर 2026 रोजी दुपारी 4 वाजता देवीच्या छबिना मिरवणुकीला सुरुवात होणार असून, नागालँड येथून आलेल्या अघोरी कलाकारांचा भव्य रोड शो आणि दिव्य कलाकृतींचे विशेष सादरीकरण हे या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.

ठाकरे नगर नवरात्र महोत्सवाच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून महाप्रसाद अन्नदानाचा उपक्रम अविरतपणे राबविण्यात येत आहे. यंदा या उपक्रमाचे 26 वे वर्ष असून, धार्मिक परंपरेसोबतच सामाजिक बांधिलकी जपत महोत्सवाच्या माध्यमातून महावस्त्रदानाचाही उपक्रम सातत्याने सुरू ठेवण्यात आला आहे.

नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने देवीच्या छबिना मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले असून, या मिरवणुकीत नागालँड येथून आलेल्या अघोरी कलाकारांचा भव्य रोड शो सादर केला जाणार आहे. विविध दिव्य कलाकृती आणि विशेष सादरीकरणामुळे या मिरवणुकीत आकर्षकता निर्माण होणार आहे. या कार्यक्रमासाठी नागरिकांमध्ये उत्सुकता आहे.

दरम्यान, महोत्सवाच्या वतीने महिलांसाठी ‌‘खेळ पैठणीचा' या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात आकर्षक पैठणीसह विविध बक्षिसे जिंकण्याची संधी महिलांना मिळणार आहे. तसेच लहान मुलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरणही करण्यात येणार आहे. धार्मिक उत्सवाबरोबरच सामाजिक उपक्रम, अन्नदान, महावस्त्रदान, महिलांसाठी मनोरंजनात्मक कार्यक्रम आणि बालकांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या स्पर्धांच्या माध्यमातून ठाकरे नगर नवरात्र महोत्सवाने सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरा जपण्याचा प्रयत्न केला आहे. या भव्य मिरवणुकीसह विविध कार्यक्रमांचा लाभ घेण्यासाठी धाराशिव शहरातील नागरिक, महिला, युवक आणि बालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ठाकरे नगर नवरात्र महोत्सवाच्या वतीने करण्यात आले आहे.


 
Top