भुम (प्रतिनिधी)- सन 2026-27 च्या ऊस गाळप हंगामात सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांमधील ऊस वजन प्रक्रियेत पारदर्शकता, विश्वासार्हता आणि अचूकता राखण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. साखर कारखान्यांवरील वजनकाट्यांची तपासणी, पडताळणी आणि सीलिंग शेतकरी प्रतिनिधींच्या उपस्थितीत करण्यात येणार असून, वजनाबाबतच्या तक्रारींची दखल घेण्यासाठी भरारी पथकेही कार्यरत राहणार आहेत.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसाचे अचूक वजन व्हावे आणि वजनामध्ये कोणत्याही प्रकारची अनियमितता होऊ नये, यासाठी प्रशासनाने ही खबरदारी घेतली आहे. साखर कारखान्यांमध्ये वापरण्यात येणाऱ्या वाहन काट्यांची पडताळणी, मुद्रांकन आणि सीलिंग प्रक्रिया पारदर्शक व लोकाभिमुख पद्धतीने करण्यावर भर देण्यात येणार आहे. या प्रक्रियेदरम्यान शेतकरी प्रतिनिधींना उपस्थित राहण्याची संधी दिली जाणार आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या स्तरावर भरारी पथके
जिल्हाधिकारी यांच्या स्तरावर भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. या पथकांमध्ये महसूल विभाग, पोलीस विभाग, वैधमापनशास्त्र विभाग, प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयाचे अधिकारी तसेच शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींचा समावेश करण्यात आला आहे. वजनकाट्यांमध्ये काही गैरप्रकार किंवा अनियमितता आढळल्यास त्याची तपासणी करून आवश्यक कार्यवाही करण्याची जबाबदारी या पथकांवर राहणार आहे.
खासगी वजनकाट्यावर ऊसाचे वजन केल्यानंतर शेतकऱ्यांना काही अडचणी आल्यास त्यांनी प्रादेशिक सहसंचालक (साखर), सोलापूर यांच्याकडे तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. तक्रार करताना संबंधित घटनेचे पुरावे सादर केल्यास तक्रारीची दखल घेणे सुलभ होणार आहे. ऊस वजनासंदर्भातील तक्रारींचे निराकरण करण्यासाठी वैधमापनशास्त्र विभागाच्या छत्रपती संभाजीनगर विभागाच्या स्तरावर नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे. असे वैधमापनशास्त्र विभाग, लातूर व धाराशिव जिल्ह्याचे उपनियंत्रक अ. ध.गेटमे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.