भूम (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावरगाव (पा.), ता. भूम, जि. धाराशिव येथे आज आजी-आजोबा व ज्येष्ठ नागरिक मेळाव्याचे अत्यंत उत्साहपूर्ण आणि आपुलकीच्या वातावरणात आयोजन करण्यात आले. शाळेचे अंगण आजी-आजोबांच्या उपस्थितीने अक्षरशः गजबजून गेले. बालक, पालक, शिक्षक आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यातील प्रेम, जिव्हाळा आणि अनुभवांची देवाणघेवाण यामुळे या मेळाव्याला एक आगळेवेगळे शैक्षणिक व सामाजिक महत्त्व प्राप्त झाले.
आजी-आजोबा हे कुटुंबातील केवळ ज्येष्ठ सदस्य नसून ते परंपरा, संस्कार, अनुभव, लोकज्ञान आणि जीवनमूल्यांचे जिवंत विद्यापीठ आहेत. त्यांच्या जीवनातील अनुभवांमधून मुलांना कष्ट, प्रामाणिकपणा, संयम, सहकार्य, माणुसकी, निसर्गप्रेम, कुटुंबव्यवस्था आणि सामाजिक बांधिलकी यांसारखी मूल्ये सहज शिकता येतात. आजच्या बदलत्या जीवनशैलीत मुलांचा ज्येष्ठ पिढीशी संवाद वाढावा, त्यांच्या अनुभवांना शैक्षणिक प्रक्रियेशी जोडता यावे आणि “पिढ्यांमधील संवाद” अधिक समृद्ध व्हावा, या व्यापक उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. शिक्षण म्हणजे केवळ पाठ्यपुस्तकातील माहिती नव्हे, तर जीवनातून शिकण्याची प्रक्रिया आहे. आजी-आजोबांच्या आठवणी, बालपणीचे अनुभव, गावातील जुनी परंपरा, शेतीविषयक ज्ञान, लोककथा, म्हणी, ओव्या, सण-उत्सव, जुन्या खेळांची माहिती आणि सामाजिक जीवनातील बदल यांचा विद्यार्थ्यांच्या अध्ययनाशी सुंदर मेळ घालता येतो.
ज्येष्ठ नागरिकांच्या अनुभवातून विद्यार्थ्यांना स्थानिक इतिहास, परिसर अभ्यास, भाषा विकास, मौखिक अभिव्यक्ती, मूल्यशिक्षण, सामाजिक-भावनिक विकास आणि सर्जनशीलता यांसाठी समृद्ध अनुभव मिळू शकतात. त्यामुळे अशा मेळाव्यांमधून वर्गातील शिक्षणाला प्रत्यक्ष जीवनाचा संदर्भ प्राप्त होतो. संबंधित मेळावा यशस्वी करण्यासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आण्णा महानवर, उपाध्यक्षा सोनाली समाधान यादव व इतर सदस्य, ग्रामस्थ, शिक्षणप्रेमी पालक, अंगणवाडी सेविका कुलकर्णी, पूजा कांबळे, नभा महानवर, मंजुळा यादव, मधुकर महानवर व हनुमंत महानवर यांनी सहकार्य केले. तर संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन शाळेचे मुख्याध्यापक माधव पोतरे तर उपस्थित सर्व आजी -आजोबांचे व जेष्ठ नागरिकांचे आभार उपक्रमशील शिक्षिका धनलक्ष्मी पोतरे यांनी मानले. अतिशय नियोजनबद्ध कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
