धाराशिव (प्रतिनिधी)- देशाच्या सीमांचे रक्षण करताना प्राणांची बाजी लावणाऱ्या सैनिकांच्या शौर्याला सलाम आणि त्यांच्या त्यागाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी धाराशिव येथील सैनिक कल्याण कार्यालयात 29 सप्टेंबर रोजी 12 वा ‘शौर्य दिन' साजरा करण्यात आला. यावेळी शहीद जवानांच्या स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.वीर पत्नी,वीर माता व वीर पित्यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला,तर उपस्थित माजी सैनिक आणि माजी सैनिकांच्या विधवा पत्नींचाही गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.भारतीय सैन्य दलाने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून सर्जिकल स्ट्राईकद्वारे अतिरेक्यांचा खात्मा केला होता.
भारतीय सैन्याची ही अभिमानास्पद कामगिरी राज्यातील जनतेपर्यंत व्यापक प्रसिद्धीद्वारे पोहोचविण्यासाठी तसेच सैनिकांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी 29 सप्टेंबर रोजी ‘शौर्य दिन' साजरा करण्याचे शासनाने सूचित केल्यानुसार यंदा 29 सप्टेंबर 2026 रोजी सैनिक कल्याण कार्यालय,धाराशिव येथे 12 वा शौर्य दिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी शिवाजी गोणे होते.प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय,येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक आमोद भुजबळ उपस्थित होते.यावेळी जिल्ह्यातील माजी सैनिक,वीर पत्नी,माजी सैनिकांच्या विधवा पत्नी,अवलंबित तसेच विविध कार्यालयांतील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
सैनिकांच्या अतुलनीय शौर्याबद्दल अभिमान आणि त्यांच्या त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शौर्य दिन साजरा करण्यात येतो.याच भावनेतून कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते शहीद जवानांच्या स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर वीर पत्नी,वीर माता आणि वीर पित्यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.उपस्थित माजी सैनिक तसेच माजी सैनिकांच्या विधवा पत्नींचाही गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला जिल्हा कोषागार कार्यालयातील अधिकारी,कर्मचारी जिल्ह्यातील 3 वीर पत्नी,वीर माता व वीर पिता,41 माजी सैनिक,माजी सैनिकांच्या विधवा पत्नी व अवलंबित तसेच विविध कार्यालयांतील 9 कर्मचारी असे एकूण 53 जण उपस्थित होते.
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने वरिष्ठ लिपिक गुरुनाथ कुलकर्णी यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. कल्याण संघटक तानाजी एकनाथ वाघ यांनी उपस्थितांचे आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.