धाराशिव (प्रतिनिधी)- विधान परिषद निवडणुकीत नागपूर पदवीधर मतदारसंघातून अभिजीत वंजारी, छत्रपती संभाजीनगर अर्थात मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून डॉ. प्रतापसिंह पाटील आणि पुणे पदवीधर मतदारसंघातून हर्षदा देशमुख-जाधव यांनी मिळविलेल्या विजयाचा आनंद धाराशिवमध्ये जल्लोषात साजरा करण्यात आला. धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटी व महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे वाटून विजयाचा आनंद व्यक्त केला. या निवडणुकीत सुशिक्षित पदवीधर मतदारांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना दिलेला कौल महत्त्वपूर्ण असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. अटीतटीच्या आणि चुरशीच्या लढतीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळविल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. या निकालातून पदवीधर मतदारांनी आपली भूमिका स्पष्ट केल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. आगामी काळातही महाराष्ट्रातील जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी महाविकास आघाडी कटिबद्ध राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
या आनंदोत्सवात धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष उमेश राजे निंबाळकर, प्रशांत पाटील, विनोद वीर, धनंजय राऊत, शीला उंबरे, खलील सय्यद, अजित शेळके, अग्निवेश शिंदे, महबूब पटेल, अझहर पठाण, शिवाजी गायकवाड, सरफराज काजी, चंद्रकांत जाधव, आयुब पठाण, अभिषेक बागल, आरिफ मुलानी, संजय गजधने, संकेत पडवळ, सय्यद मन्सूर, कृपाल सिंह ठाकूर यांच्यासह काँग्रेस व महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
