धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यात दुष्काळाचे संकट अधिक गडद होण्याची शक्यता आहे. वाढते तापमान, घटता जलसाठा आणि खालावणारी भूजल पातळी यामुळे आगामी काळात पाणीटंचाईचे आव्हान गंभीर होऊ शकते. ही दाहक परिस्थिती लक्षात घेऊन जिल्ह्यातील संभाव्य संकटाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा-पाणी आणि ग्रामीण भागातील रोजगाराचे प्रश्न वेळेत सोडविण्यासाठी प्रत्येक गावात नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. नागरिकांनी त्यांच्या अडीअडचणी सोडवून घेण्यासाठी गावातील नोडल अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. असे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.
शासन आणि नागरिक यांच्यातील दुवा म्हणून हे अधिकारी काम करणार आहेत. गावातील पाणीटंचाईची परिस्थिती जाणून घेणे, पाणीपुरवठ्यातील अडचणी सोडविण्यासाठी पाठपुरावा करणे, जनावरांसाठी चारा-पाण्याची उपलब्धता तपासणे आणि रोजगाराच्या प्रश्नांवर संबंधित विभागांशी समन्वय साधणे, अशी जबाबदारी त्यांच्यावर असेल. त्यामुळे नागरिकांनी आपल्या गावातील नियुक्त नोडल अधिकाऱ्यांशी संपर्क साधून समस्या त्यांच्या निदर्शनास आणून द्याव्यात, असे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे. या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन गावपातळीवरच समस्यांची माहिती मिळावी आणि त्यावर वेळेत उपाययोजना करता याव्यात, यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पाणीटंचाई निर्माण झाल्यानंतर धावपळ करण्यापेक्षा संभाव्य अडचणींची माहिती आधीच मिळणे आणि त्यानुसार नियोजन करणे महत्त्वाचे आहे. गावात पिण्याचे पाणी नियमित मिळते का, कोणत्या वस्त्या आणि वाड्यांमध्ये पाणीटंचाई आहे, याची माहिती नोडल अधिकाऱ्यांनी घ्यायची आहे. समस्यांची माहिती संबंधित विभागाला देऊन आवश्यक उपाययोजनांसाठी पाठपुरावा करणे अपेक्षित आहे. त्यामुळे गावातील नागरिकांच्या अडचणी प्रशासनापर्यंत पोहोचविणे आणि शासकीय उपाययोजनांची अंमलबजावणी करणे अधिक सुलभ होणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले आहे. दुष्काळाचा फटका केवळ माणसांनाच बसत नाही. शेतकऱ्यांसमोर जनावरांच्या संगोपनाचाही प्रश्न उभा आहे.
