तुळजापूर (प्रतिनिधी)- शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर येथील डॉ. उदय वैद्य यांनी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानला ५ स्ट्रेचर तसेच प्रथमोपचाराचे आवश्यक साहित्य भेट दिले. हे साहित्य त्यांनी आज श्री तुळजाभवानी देवींच्या दर्शनासाठी आले असता मंदिर संस्थानकडे सुपुर्द केले.
मंदिर संस्थानच्या वतीने सहायक व्यवस्थापक (सामान्य) जयसिंग पाटील यांनी हे साहित्य स्वीकारले. डॉ. उदय वैद्य हे दरवर्षी शारदीय नवरात्र महोत्सव तसेच चैत्र पौर्णिमा यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंदिर संस्थानला प्रथमोपचार साहित्य उपलब्ध करून देत असतात. श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने सहायक व्यवस्थापक (सामान्य) जयसिंग पाटील यांनी डॉ. उदय वैद्य यांचा श्री तुळजाभवानी देवींची प्रतिमा भेट देऊन सत्कार केला. यावेळी सहायक सुरक्षा निरीक्षक श्रीकांत पवार तसेच मंदिर संस्थानचे कर्मचारी उपस्थित होते.
